चंद्रपूर : चंद्रपुरात आता ब्राऊन शूगरही येत असल्याची धक्कादायक बाब दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईतून पुढे आली. या ब्राऊन शुगरचे नागपूर कनेक्शन असल्याचे तपासात उघड होताच स्थानिक गुन्हे शाखेने नागपुरातील एका महिलेसह दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपासातून चंद्रपुरातील तरुणांना ब्राऊन शुगरच्या नादी लावणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब खाडे यांनी वर्तविली आहे.
चित्रा प्रदीपसिंग ठाकूर (३४, रा. इतवारी रेल्वे, नागपूर) व नरेन उर्फ बाली चिंतामण बोकडे (२०, रा. फुकटनगर, कावलापेठ, नागपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चित्रा ठाकूर या महिलेवर नागपुरातील पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शूगरची तस्करी होत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे आल्या होत्या. या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना एनडीपीएस पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हापासून पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वातील पथक अमली पदार्थाच्या तस्करीवर बारीक लक्ष ठेवले होते. सोमवारी वरोरानाका उडाणपूल येथे ब्राऊन शूगरची विक्री होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अजय सीताराम धुनीरवीदास याच्याकडून स्कूल बॅगमधून २२ ग्रॅम ब्राऊन शूगर जप्त करण्यात आले. चौकशीत नागपूर येथून ब्राऊन शूगरची तस्करी झाल्याचे पुढे आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर गाठून चित्रा ठाकूर व नरेन बोकडे याला अटक केली. दोघांनाही १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या पथकाने केली.
ब्राऊन शूगरचे व्हाया नागपूर नाशिक-मुंबई कनेक्शन
स्थानिक गुन्हे शाखेने नागपुरातून अटक केलेली महिला नाशिक, मुंबई येथून ब्राऊन शूगर आणत असल्याचे पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. त्या महिलेवर नागपूर शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये एनडीपीएस व दारूबंदी संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.