हरदोना : यावर्षी अपुऱ्या पडलेल्या पावसाने नदी, नाले, तलाव आटले असल्याने आतापासूनच पाणी टंचाईने उग्ररुप धारण करायला सुरुवात केली आहे. या परिसरात हिवाळ्यातच जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले असल्याने यावर्षी पाणी टंचाईची झळ अनेक गावांना सोसावी लागणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल दीड महिना उशिरा पाऊस पडला. त्याचा परिणाम शेतपिकावर झाला असून पाण्याअभावी सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला. निसर्ग आता बेभरवशाचा झाल्याने पावसाचा कोणताच अंदाज बांधणे कठीण झाले आहे. हिवाळ्यातच नदी, तलाव, नाले, कोरडे पडत चालल्याने पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. पाण्याअभावी जमिनीला तडे गेल्याने शेतातील उभे पीक सुकत चालले आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याने यावर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाण्याअभावी नदी, तलाव, नाल्यात पाणी साठले नाही. त्यामुळे हिवाळ्यातच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)
हिवाळ्यातच नाले तलाव आटले
By admin | Published: November 18, 2014 10:53 PM