चंद्रपूर : शहरात तसेच इतर जिल्हाभरात अवैध शिकवणी वर्गाला ऊत आला आहे. शिकवणी वर्ग लावण्यासाठी शाळेचे शिक्षकच विद्यार्थ्यांना सक्ती करीत असून त्यांच्याकडून शिकवणीच्या नावावर हजारो रुपये वसूल करीत आहेत. याकडे मात्र, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नामांकित महाविद्यालयात कार्यरत असलेल्या व महिन्याकाठी लाखाच्या घरात पगार उचलणाऱ्या प्राध्यापकांकडूनच विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात आहे. महाविद्यालयात ज्ञानार्जन करण्याऐवजी परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर आमच्याकडे शिकवणी वर्ग लावा, अशी सक्ती या प्राध्यापकांकडून केला जात आहे. चंद्रपूर शहर तसेच जिल्हाभरात अवैध शिकवणी वर्गाचे दुकानच लागले आहे. एवढेच नव्हे तर काही महाविद्यालयातील शिक्षकांनी एकत्र येवून अकॅडमी तयार करून शाळेत, महाविद्यालयात विद्यार्जन करण्याऐवजी विद्यार्थ्यांना जबरीने शिकवणी वर्गात येण्यास भाग पाडले जात आहे. यात मात्र गरीब विद्यार्थी भरडल्या जात आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या शिकवणी वर्गास नकार दिला, अशा विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक परीक्षेचे गुण न देण्याची धमकीही या प्राध्यापकांकडून दिल्या जात आहे. प्रती अभ्यासक्रम ३० ते ३५ हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घेतले जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. गतवर्षी जिल्हा शिक्षणाधिकारी देशपांडे यांनी काही अवैध शिकवणी वर्गांवर धाड टाकून कारवाई केली. मात्र, जोमाने शिकवणी वर्ग सुरूच आहेत. या शिकवणी वर्गामार्फत येणाऱ्या पैशातून काही टक्के रक्कम व्यवस्थापन मंडळाला दिले जात असल्याची माहिती आहे. प्राध्यापकांना लाखाच्या घरात पगार मिळत असतानाही शिक्षणाचा काळाबाजार करून शिक्षकी पेशाला काळीमा फासत विद्यार्थ्यांना वेठीस धरुन पिळवणूक केली जात आहे. यातून प्राध्यापक वर्ग वर्षाकाठी करोडो रुपयंची उलाढाल करीत आहेत. शिकवणी वर्ग घेणाऱ्या प्राध्यापकाच्याविरोधात तक्रारी झाल्यास शिक्षण विभागाकडून थातुरमातूर कारवाई केली जाते. यात पैशाची देवाण-घेवाणही होत असल्याची चर्चा आहे. यामुळे काही दिवसांतच हे प्राध्यापक पुन्हा शिकवणी वर्ग सुरू करतात. प्राध्यापकांच्या अवैध शिकवणी वर्गावर आळा घालण्याची मागणी गरिब पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शिकवणी वर्गाच्या नावावर विद्यार्थ्यांची सर्रास लूट
By admin | Published: October 21, 2014 10:49 PM