राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली. उर्वरित १२ हजार १५७ शेतकऱ्यांची नावे अपलोडविना आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यातील २ हजार रूपयांचा लाभ मिळण्यास विलंब होणार आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात नागपूर विभागात जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे.केंद्र सरकारने निवडणुकीला एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना शेतकरी सन्मान योजनेची घोषणा करून १ डिसेंबर २०१८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे जाहीर केले. केंद्राकडून यासंदर्भात राज्य सरकारला आदेश धडकताच जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने अन्य कामे बाजूला सारून शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याला प्राधान्य दिले. यादी तयार करून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रूपये टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करताना प्रशासनाची प्रचंड दमछाक होत आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी करताना सरकारने नीट होमवर्क केलेच नाही, याचा प्रत्यय येत आहे. जिल्ह्यात ३ लाख ६१ हजार ७९९ शेतकरी आहेत. यातील २ लाख ६० हजार ४६२ शेतकरी अल्पभूधारक गटात येतात. शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी दोन एकरची मर्यादा लागू केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांमधून निकषानुसार निवड करताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकरी सन्मान निधी तीन टप्प्यात देण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु, पात्र शेतकऱ्यांची नावे एनआयसीवर अपलोड करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकरी सन्मान योजनेचे जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्यात ४९.८६ टक्के काम झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.पहिल्या टप्प्यातील लाभार्थी किती ?आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे एनआयसीवर अपलोड करण्यात प्रशासनाला शक्य झाले. पण, बँक खात्यात रक्कम जमा झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती, हे प्रशासनाने अद्याप अधिकृत जाहीर केले नाही. १२ हजार १५७ नावे अपलोड करण्याची कामे सुरू असतानाच रविवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेकडे अन्य कामे सोपविण्यात आली. शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याचा सहावा क्रमांक आहे.
१२ हजार १५७ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’वर अपलोडच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:27 PM
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार २६ शेतकरी पात्र ठरतात. आतापर्यंत १ लाख २९ हजार ८६९ शेतकऱ्यांची नावे ‘एनआयसी’ वर अपलोड करण्यात आली.
ठळक मुद्देशेतकरी सन्मान निधी योजनेची कुर्मगती : पहिल्या टप्प्यातील लाभ मिळण्यास विलंब