राजेश मडावी
चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने अनेकदा मुदतवाढ देऊनही छायाचित्र सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्रातील तब्बल ६८ हजार ९३४ मतदारांची नावे यादीतून डिलीट करण्यात आली आहेत.
चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा व चिमूर विधानसभा क्षेत्रातील मतदारयादी अपडेट करण्याची मोहीम जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मतदार यादीतील ज्यांची नावे आहेत. मात्र, छायाचित्र सादर केले नाही, अशा मतदारांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पाचही विधानसभा मतदारसंघातून छायाचित्र नसलेले ७५ हजार ४५ मतदार आढळले. यातील काहींचे निधन झाले तर अनेकांनी नोकरी, रोजगार अथवा व्यवसायासाठी स्थानांतरण केले. हयात असणाऱ्या मतदारांना छायाचित्र सादर करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली. मतदारांकडून प्रतिसादच न मिळाल्याने पुन्हा शेवटची संधी म्हणून २४ जुलै २०२१ पर्यंतची डेडलाईन दिली होती. मतदार यादीत आपले नावे नसल्यास अडचणी येणार हे लक्षात येताच ६ हजार ६१ मतदारांनी छायाचित्र सादर केले. सद्य स्थितीत ५० मतदारांची नावे छायाचित्राविना शिल्लक आहेत तर तब्बल ६८ हजार ९३४ मतदारांची नावे निवडणूक विभागाने डिलीट केली.
बॉक्स
चंद्रपूर मनपा निवडणुकीचे समीकरण गडबडणार
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील यादीच्या तुलनेत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या यादीतून वगळलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक २९ हजार ९२३ एवढी आहे. यातील बहुसंख्य मतदार प्रामुख्याने चंद्रपुरातील रहिवासी आहेत. चंद्रपूर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हीच सुधारित मतदारयादी वापरण्यात येणार आहे. मतदारांची नावे अपडेट झाली नाही तर, मनपा निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवरही याचा परिणाम होऊ शकतो. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातही वगळलेल्या मतदारांची संख्या मोठी आहे.
बॉक्स
मतदारयादीत पुन्हा नाव येण्यासाठी...
मतदारयादी अद्ययावत करताना निवडणूक आयोगाने छायाचित्र सादर करण्याची अट लागू केली. त्यानुसार छायाचित्र सादर केलेल्या चार मतदार संघातील ६ हजार ६१ मतदारांची नावे निवडणूक विभागाने अपलोड केली. ज्यांची नावे डिलीट झाली त्यांनी पुन्हा विहित प्रपत्रात अर्ज सादर केल्यास मतदार यादीत नाव समाविष्ट केले जाईल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.
विधानसभानिहाय वगळलेले मतदार
चंद्रपूर- २९,९२३
राजुरा- ५,२८९
बल्लारपूर- १९,२२५
चिमूर- ७,०४०
वरोरा- ७,४५७
एकूण- ६८,९३४