पोलीस अधीक्षकांकडे तक्रार : शेतजमीन फसवणूक प्रकरणगडचांदूर : नजीकच्या निमणी येथील घुलाराम कान्हू राऊत (६०) या शेतकऱ्याच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन गडचांदूर येथील शोयब जिलानी या सावकराने १६ हजारात लाखोंची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता. सदर प्रकरणाला आता वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. इसारपत्र सहकाऱ्याच्या नावाने आणि विक्री स्वत:च्या नावाने करण्याचे बोगस काम सुरू होते. वकिलाकडून मिळालेल्या नोटीसवरून सदर बाब उजेडात आली आहे. कारण दोन्ही मुद्रांकावर साक्षदार म्हणून संजय आनंदराव दिवसे व अमोल गौरकार रा. निमणी यांचीच नावे होती.जिलानी यांनी त्यांचा सहकारी जावेद भैय्या शेख यांच्या नावाने इसारपत्र केले होते आणि स्वत:च्या नावाने विक्री करण्याचे बोगस काम करण्याची प्रक्रिया सुरू होती. जावेद शेख यांनी वकिलामार्फत घुलाराम राऊत यांना नोटीस पाठविल्यामुळे निरक्षर शेतकरी घाबरला आहे. जावेद भैय्या शेख यांच्यामागे शोयब जिलानी असल्याचे राऊत यांच्या निदर्शनात आले. पोलिसांनी तात्पुरती कारवाई केल्यामुळे सहकाऱ्यांच्या मदतीने राऊत यांनी पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली आहे.कोरपना पोलिसांनी सावकार शोयब जिलानी, अर्जनविस एम.एम. हुसेन, संजय आनंदराव दिवसे व अमोल गौरकार दोन्ही रा. निमणी यांच्यावर भादंविच्या कलम ४२०, ४६७ व ३४ नुसार गुन्हे दाखल केले. जावेद शेख यांचे नाव समोर आल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.मुलीचा विवाह असल्याने घुलाराम राऊत यांना १६ हजार रुपयांची गरज होती. गावातील संजय दिवसे यांच्याकडे त्यांनी आपली अडचण मांडली व राऊत अमोल गौरकार यांच्याकडे गेले. त्यांना शोयब जिलानी यांनी १०० रुपयांचा मुद्रांक, नमुना आठ व सातबारा आणण्यास सांगितले. त्यावर जिलानी यांनी १६ हजार दिले म्हणून लिहायचे सोडून राऊत यांच्या ३ एकर शेतीचे जावेद शेख यांच्या नावाने इसारपत्र केले व जिलानी यांनी स्वत:च्या नावे विक्रीपत्राची तयारी करून घुलाराम यांच्या सह्या घेतल्या होत्या. मात्र मुद्रांकावर ५ लाख रुपये दिल्याचे नमूद होते. त्यामुळे घाबरून राऊत यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले व खोटे मुद्रांक जप्त केले. (शहर प्रतिनिधी)जुन्या तक्रारीनुसार आपण ताबडतोब आरोपींवर योग्य ती कारवाई केली. पुन्हा नवीन तक्रार प्राप्त झाली असून त्यात आणखी एका आरोपीचे नाव समाविष्ट आहे. आपण त्या दिशेने पुन्हा चौकशी करून कारवाई करणार असून घुलाराम राऊत यांच्या जमिनीला धक्का लागणार नाही.- योगेश पारधी, ठाणेदार, कोरपना
इसार एकाचे विक्री दुसऱ्याच्या नावे
By admin | Published: July 14, 2014 1:50 AM