चंद्रपूर : जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थी मागे पडू नये यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र काही शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्या उदासिन धोरणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. जिल्हा परिषद शाळा नांदा फाटा येथील शिक्षकांच्या अनियमिततेमुळे शिक्षणविभागाने कारणे दाखवा नोटीस बजावला आहे. एवढेच नाही तर विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांनाही खुलासा मागितला आहे.शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद शाळांतील गुणवत्ता वाढविण्याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनीही तसे निर्देश दिले आहे. यामुळे शिक्षण विभाग सतर्क झाला असून शाळांना भेटी तसेच गुणवत्ता तपासणे सुरु केले आहे.जिल्हा परिषद शाळा नांदा फाटा येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविकांत देशपांडे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली असता अनेक त्रुट्या आढळून आल्या. यामध्ये सकाळी १० वाजता शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र शिक्षक शाळेत उशिरा उपस्थित झाले. तर एक शिक्षक अनुपस्थित होते. परिपाठादरम्यान राष्ट्रगीत, प्रतिज्ञा घेण्यात आली. तेव्हा विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत योग्य प्रकारे म्हणता येत नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. विद्यार्थी ‘सिंधु’ या शब्दाचा उच्चार ‘सिंध’ असा करतात. ‘उत्कल’ या शब्दाचा उच्चार ‘उच्छल’ असा करतात. ‘गुजरात’ या शब्दाचा उच्चार गुजराट असा करीत असून योग्य प्रकारे व अचुक लयबद्ध, एका सुरात म्हणत नसल्याचे पथकाने शिक्षकांना दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, शिक्षकांनीही वार्षिक नियोजन केले असले तरी ते अचुक नाही. आॅगस्ट महिन्यात ४५ तासिका आहेत. परंतु घटक व उपघटकानुसार २९ तासिका नमूद केलेल्या आहे. काही शिक्षकांनी वार्षिक नियोजनसुद्धा दाखविले नाही. दैनिक पाठ टाचण काढलेले नाही. विशेष म्हणजे, शाळेची प्रतवारी ‘ड’ असून पथकाने खेद व्यक्त केला आहे. स्वच्छ भारत सुंदर विद्यालय, स्वच्छ भारत मिशन सप्ताह उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याचे दिसून आले नसल्याचेही म्हटले आहे.शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनाही दोषी ठरविण्यात आले असून त्यांना या प्रकरणी खुलासा मागविण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतरही शाळांमध्ये पथकाच्या वतीने भेटी देण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक रविकांत देशपांडे यांनी म्हटले आहे.काही शिक्षकांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम पडत आहे. त्यामुळे शिक्षकांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडल्यास भविष्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता नक्कीच वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)
नांदा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना नोटीस
By admin | Published: November 18, 2014 10:52 PM