मासळ बु.
: येथून काही अंतरावरील नंदारा येथे शुक्रवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने शेतातील धुऱ्याला आग लावली. या आगीत शेतातील झोपडी, गहू, चना, तणसाचे ढीग जळून खाक झाले. शेतमालक जांभुळे शुक्रवारी सायंकाळी शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली.
तुकुम येथील शेतकरी जनार्धन जांभुळे यांच्या मालकीची शेतजमीन नंदारा गावालगत आहे. अज्ञात व्यक्तीने जांभुळे यांच्या शेतातील धुऱ्याला आग लावली. धुऱ्याला लागून असलेली झोपडी, तणसाचा ढिगारा, गहू, चना जळून खाक झाला. लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, नंदारा गावापासून शेत लांब असल्याने व दुपारची वेळ असल्याने आजूबाजूच्या शेतात कोणीही नव्हते. या घटनेची माहिती शेतकरी जनार्धन जांभुळे यांनी नंदारा येथील सरपंच बबन गायकवाड, भूषण डाहुले ग्रामपंचायत सदस्य, तुकुम पोलीस पाटील संजय शेडामे, नंदारा पोलीसपाटील विजय नन्नावरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विनायक गजभे यांना दिली. घटनास्थळावर नुकसानीचे निरीक्षण केले. यामध्ये जनार्धन जांभुळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.