घोसरी : वीज देयके एक महिना थकले की वीजपुरवठा खंडित करण्याची तत्परता दाखविणारे महावितरणचे अधिकारी मात्र नांदगाव-घोसरी परिसरात सततचा वीजपुरवठा खंडित होत असताना हातावर हात ठेवून असतात. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पोंभूर्णा- मूल तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव- घोसरी परिसरात वीजपुरवठा सतत खंडित होण्याचे सत्र सुरू झालेले आहे. परिणामी घरगुती ग्राहकासह पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असून एक-दोन दिवस पिण्याच्या शुध्द पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. विशेषतः सद्य:स्थितीत तप्त उन्हाचे चटके जनतेला असह्य होत असून विजेअभावी विद्युत उपकरणे बंद पडत आहेत. त्यामुळे पंखे व कुलरचा गारवा मिळत नसल्याने नागरिकांसह लहान मुलांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याकडे महावितरण कंपनीने गांभीर्याने लक्ष द्यावे व वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जनतेनी केलेली आहे.