चंद्रपूर :चंद्रपूर-नागपूर महामार्गावर नंदोरी जवळ कोंढा फाट्यावर शनिवारी (दि. २) एकाच दिवशी दोन रानमांजराचा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी रानमांजर मृतावस्थेत आढळली. शुक्रवारी सात फूटांचा अजगराचाही बळी गेला. मार्ग तयार करताना वन्यजीवांचा विचार झाला नाही. त्यामुळे रस्ते अपघातात यापूर्वी बिबट, निलगाई, तडस, कोल्हा, रानटी डुक्कर व अनेक सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडले, असा आरोप हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे सदस्य गणेश पिदूरकर यांनी केला.
चंद्रपूर-नागपूर महामार्गालगत वरोरा- भद्रावती वनपरिक्षेत्राचे जंगल असल्याने वन्यप्राण्यांची मोठी विपूलता आहे. रानमांजरांची संख्या तर बरीच मोठी आहे. वाघ, बिबट व अन्य वन्यप्राणी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील नंदोरी जवळूनच नेहमी रस्ता ओलांडतात. वन्यजीवांसाठी अजूनही महामार्ग प्रशासन किंवा वनविभागाने उपशमन योजनेची अंमलबजावणी केली नाही. रस्ता बांधताना वन्यप्राण्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देणे हा उपशमनाचा हेतू आहे. पण, शासन व बांधकाम करणाऱ्या कंपनीने दुर्लक्ष केल्याने वन्यप्राण्यांचे अपघातात बळी जात आहे, असेही हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटीचे सदस्य गणेश पिदूरकर यांनी नमुद केले आहे.