चंद्रपूर : मागील वर्षभर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला; मात्र सत्राच्या शेवटी परीक्षा न देताच पास करण्याची वेळ कोरोना संकटामुळे आली. याही वर्षी पुन्हा कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे लसीकरणाचा एकमेव पर्याय सद्यस्थितीत आहे. सर्वांनाच लस देणे सध्या तरी शक्य नसल्यामुळे यावर्षीही नर्सरी, केजीच्या विद्यार्थ्यांंना घरीच रहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांची चिंता अधिकच वाढली आहे.
मागील वर्षी कोरोना संकट आल्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर नवव्या वर्गापर्यंतच्या परीक्षाच झाल्या नाही. त्यानंतर वर्षभर ऑनलाइन अभ्यासक्रमावर शैक्षणिक सत्र सुरू होते; मात्र यावर्षीही पुन्हा कोरोनाचे संकट आल्यामुळे परीक्षाच रद्द कराव्या लागल्या. त्यातच नर्सरी, केजीच्या एवढेच नाही तर पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शाळा, शिक्षकांनासुद्धा बघितले नाही. तरीही ते दुसऱ्या वर्गात गेले आहेत. हीच अवस्था पुढील शैक्षणिक वर्षातही राहण्याची शक्यता आहे. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची तसेच लहान बालकांना अधिक धोकादायक ठरण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच मुलांच्या शैक्षणिक भविष्याचीही चिंता त्यांना सतावत आहे.
वर्षभर कुलूप, यंदा?
नर्सरी, के.जी च्या शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप तरी शासन स्तरावर कोणतेही धोरण ठरले नाही; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता काही महिन्यांपर्यंत प्री-प्रायमरीच्या शाळा सुरू करणे धोक्याचे ठरू शकेल. या शाळा काही दिवस बंदच ठेवाव्या. त्यातच तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर कोरोना स्थिती बघून प्री-प्रायमरीच्या शाळा सुरू कराव्या.
- दिलीप झाडे, संस्थाध्यक्ष
स्काॅलर सर्च अकादमी, कोरपना.
कोट
सध्या कोरोनाची परिस्थिती बघता पुढील वर्षभरही नर्सरी, के.जी.चे वर्ग सुरू होतील, असे वाटत नाही. त्यामुळे यावर्षी या विद्यार्थ्यांना घरीच रहावे लागणार आहे. जोपर्यंत लसीकरण पूर्ण होणार नाही, तोपर्यंत प्री-प्रायमरीच्या शाळा सुरू करू नये.
-मनिष तिवारी
संस्थाध्यक्ष
ट्रिंकल इंग्लिश स्कूल, चंद्रपूर.
कोट
कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांसह संस्थाचालकही अडचणीत सापडले आहेत. पुढील शैक्षणिक सत्रही कोरोना संकटात जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नर्सरी, केजीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता कमी आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला गती द्यावी. म्हणजे संभाव्य धोके आपल्याला टाळता येऊ शकतील.
-उमाकांत धांडे
संस्थाध्यक्ष
संस्कार काॅन्व्हेंट, चंद्रपूर.
----
कोट
पालक परेशान
मागील वर्षभर प्राथमिकचे वर्गच झाले नाहीत. त्यामुळे नर्सरी, केजी एवढेच नाही तर पहिलीचे विद्यार्थी शाळा न बघताच दुसरीतही गेले आहेत. या विद्यार्थ्यांचा पायाच मजबूत झाला नाही तर भविष्य कसे होणार, ही चिंता आहे. त्यातच आता मुले घरी राहून कंटाळली आहेत. टीव्ही, मोबाइल एवढेच त्यांचे जग असल्यासारखे वाटते.
-प्रतिभा कोडापे, चंद्रपूर.
कोट
कोरोना संकटामुळे मागील वर्षीसारखीच पुढील सत्रातही शाळा भरण्याची शक्यता नाहीच. आता तर मुले कंटाळली आहेत. ऑनलाइनच्या माध्यमातून वर्ग सुरू होते; मात्र शाळेत शिकण्याची मजा यामध्ये नक्कीच नाही. शिक्षक मन लावून शिकवित असले तरी विद्यार्थी इकडे-तितकेडच बघतात. त्यामुळे शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी प्रथम लसीकरण करून कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शाळा सुरू करण्याला प्राधान्य द्यावे.
-आम्रपाली मेश्राम
बल्लारपूर
कोट
कोरोना संकटामुळे शाळा सुरू नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. घरात राहून मुलांचा मानसिक ताण वाढत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अभ्यास, शाळा, खेळ यांपासून मुले दूर जात आहेत.
-मंजुषा काळे, चंद्रपूर.
-
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम
वर्षभरापासून मुलांची शाळा नाही. त्यामुळे ते घरीच अडकून पडले आहेत. अनेक मुलांमध्ये चिडचिडपणा, हट्टीपणा वाढला आहे, त्यामुळे जेवढ्या जास्त वेळ मुलांना वेळ देता येईल, तो देण्याचा प्रयत्न करा, त्यांच्याशी मिळून रहा, त्यांच्यासोबत खेळा म्हणजे, त्यांच्यातील हट्टीपणा कमी होईल. अधिकाधिक वेळ स्क्रिनसमोर बसू देऊ नका, जेवन करताना टिव्ही बघने टाळा, जुन्या गोष्टी, विविध छंद जोपासण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.