आॅनलाईन लोकमतभद्रावती : राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्काराने शुक्रवारी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. या बचत गटाचा राज्यातून दुसरा क्रमांक आला आहे. एक लाखाचे बक्षीस व सन्मानपत्र या बचत गटाला प्रदान करण्यात आले. या पुरस्काराच्या निमित्ताने भद्रावतीच्या महिलांनी दिल्लीत झेंडा रोवला.नगर विकास विभागातर्फे प्रवासी भारतीय केंद्र चाणक्यपुरी दिल्ली येथे नगर विकास मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री हरदिपसिंह पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा, आयुक्त तथा संचालक न.प. प्रशासन (म.रा.) विरेंद्र सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार उन्नती महिला बचत गटाला प्रदान करण्यात आला. यामध्ये मानसी देव, छबू कपाट, रेखा वाणी, सुनीता साव, रेखा थेले, नंदा रामटेके, रंजना मुळक, रेहान शेख, ज्योती लालसरे, सुरेखा आस्वले व व्यवस्थापक रफीक शेख यांचा समावेश होता.राज्यातून प्रथम क्रमांक हिंगोली, द्वितीय भद्रावती तर तृतीय पुरस्कार मालेगाव यांनी पटकाविला. राज्यातील ३५० शहरातील दहा वस्तीस्तर संघ या पुरस्कारसाठी पात्र ठरले. त्यातून भद्रावती न.प. अंतर्गत असलेल्या उन्नती महिला बचत गटाला दुसरा पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग व्यवसाय कसा करावा व स्वत:च्या पायावर कसे उभे राहावे याबाबत सखोल मार्गदर्शन झाले. देशभरातील उत्कृष्ठ काम करणाऱ्यांच्या केस स्टडीज दाखवण्यात आल्या. बचत गटाच्या महिलांच्या कार्याबाबत मुलाखती घेण्यात येवून त्याबाबतची डॉक्युमेंटरी नगर विकास विभागातर्फे तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या पुरस्कार प्राप्त महिला स्वच्छतेच्या बाबतीत भद्रावतीकरांना निश्चितच प्रेरणास्थान ठरणार, असे मत नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी व्यक्त केले.भद्रावतीच्या महिलांनी दिल्लीत रोवला झेंडापुरस्कारप्राप्त महिलांमुळे भद्रावतीची मान उंचावली. या महिलांमुळे भद्रावतीचा सन्मान देशपातळीवर झाला. हा सन्मान फक्त या महिलांचाच नसून भद्रावतीतील संपूर्ण महिला वर्गाचा आहे. इतर क्षेत्रात कार्य करीत असलेल्या महिलांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी भद्रावती न.प. कटिबद्ध आहे.- अनिल धानोरकर,नगराध्यक्ष, न.प. भद्रावती
भद्रावतीच्या महिला बचत गटाला राष्ट्रीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:23 PM
राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील दारिद्र्य रेषेखालील उन्नती महिला बचत गटाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छता पुरस्काराने शुक्रवारी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
ठळक मुद्देराज्यातून दुसरा क्रमांक : एक लाख रुपये व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप