राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २०१८ पासून दरवर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढत असताना जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेने २०१९-२० या वर्षात तपासलेल्या ३ हजार २४९ नमुन्यातून सेंद्रीय कर्बाअभावी शेतजमिनीची प्रकृती ढासळत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ रासायनिक खतांचा वारेमाप भडीमार न करता गांडूळ खत, शेण खत आणि कंपोस्ट आदी सेंद्रीय खत वापरून जमिनीतून अन्नद्र्रव्य उपलब्ध करून दिले नाही तर खरीप हंगामातील हेक्टरी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस आणि तूर लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातही गहू, हरभरा रब्बी ज्वारी, लाखोळी आणि इतर पिके ९३ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जातात. यंदाच्या खरीप हंगामात कापूस १ लाख ८० हजार हेक्टर, सोयाबीन ५५ हजार हेक्टर आणि तूर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन आहे.खरीप हंगामासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेन १५ तालुक्यातील प्रत्येकी १ गाव याप्रमाणे ३ हजार २४९ मातीचे नमुने पथदर्शी म्हणून तपासण्यात आले होते. विशेष म्हणजे, आदर्श गाव (मॉडेल व्हिलेज) म्हणून या गावातील नमुन्यांची निवड केली आहे. सदर जमिनीत सेंद्रीय कर्ब अत्यंत कमी असल्याचे आढळून आले. जिल्ह्यातील शेतीच्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी, स्फुरद मध्यम तर पालाश भरपूर आहे. सेंद्रीय कर्बासोबतच सूक्ष्म मूलद्रव्यांचीही कमतरता असून तांबे, मंगल पुरेसे तर जस्त व लोह कमी असल्याचे जिल्हा मृद सर्वेक्षण व चाचणी प्रयोगशाळेच्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे.सोयाबीनसाठी जमिनीत गंधकाची कमतरतासोयाबीन पिकासाठी जमिनीत गंधकाची कमतरता असल्याचे मृद सर्वेक्षण व चाचणी अहवाल सांगतो. गंधकाअभावी सोयाबीन दाणे परिपक्व होत नाही. दाण्याला चकाकी येण्यासाठी गंधकाची गरज आहे. तीन वर्षांपासून गंधक हा घटक पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला आहे. काही शेतकरी जमीन तपासणी न करताच वारेमाप रासायनिक खतांचा वापर करतात. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र वाढणार असले तरी जमिनीतील अन्न घटकांकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो.मृद निष्कर्षानूसार पिकांसाठी जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता आहे. त्यासाठी योग्य शिफारशीही केल्या आहेत. शेतकºयांनी कृषी अधिकारी व प्रयोगशाळेचा सल्ला घेऊनच खतांचा वापर करावा. अनावश्यक रासायनिक खतांचा वापर कटाक्षाने टाळावा.- अनिल चावरे, जिल्हा मृद सरंक्षण व चाचणी अधिकारी, चंद्रपूर
सेंद्रीय कर्बाअभावी ढासळली जमिनीची प्रकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 5:00 AM
जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस आणि तूर लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातही गहू, हरभरा रब्बी ज्वारी, लाखोळी आणि इतर पिके ९३ हजार ७७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जातात. यंदाच्या खरीप हंगामात कापूस १ लाख ८० हजार हेक्टर, सोयाबीन ५५ हजार हेक्टर आणि तूर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्याचे नियोजन आहे.
ठळक मुद्देमृद सर्वेक्षण व चाचणीचा निष्कर्ष : खरीप कापूस उत्पादनावर अनिष्ट परिणामाचे संकेत