बल्लारपूर पेपर मिल : शेकडो कामगारांची उपस्थितीअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर पेपर मिल शहराची आर्थिक वाहिनी आहे. ५० वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच या जागतिक स्तरावरच्या उद्योगावर अरिष्ट ओढवले. कच्च्या मालाअभावी हा उद्योग कधी चालू तर कधी बंद अवस्थेतून वाटचाल करीत आहे. परिणामी १० हजारावर कामगारावर उपासमारीचे संकट आले आहे. सरकारच्या न्याय दरबारातही निर्णय लागला नाही, अशातच नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर करून ‘कॅशलेस’ व्यवहाराचे घोडे पुढे दामटले आहे. यामुळे कागद उद्योग आणखीच अडचणीत आला आहे. यावर सरकारला सद्बुध्दी यावी व बल्लारपूर पेपर मिलवर ओढावलेले अरिष्ट दूर करण्यासाठी नवचंडी हवन करून उद्योग शांतीसाठी यज्ञ करून साकडे घालण्यात आले.मागील दोन वर्षांपासून पेपर मिलच्या चालढकल धोरणामुळे कामगारासह त्यांचे कुटुंबिय हवालदिल झाले आहेत. संकटाचे निवारण करण्यासाठी पेपर मिल द्वारा समोरील श्री गणेश मंदिरासमोर मंगळवार व बुधवारी नवचंडी हवन करून यज्ञाच्या माध्यमातून उद्योगाला शांतीप्रदान करण्यासाठी देवाकडे साकडे घालण्यात आले. बुधवारच्या यज्ञ समारंभात बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष व माजी खासदार नरेश पुगलिया, बिल्ट ग्रॉफीक पेपर प्रा.लि.चे व्यवस्थापक व्यकंटश्वरलू, टी. पद्माराव, पेपर मिलचे अधिकारी रमेश यादव, आष्टीचे पेपर मिलचे कामगार प्रतिनिधी बॅनर्जी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.बल्लारपूर पेपर मिल सुरळीत चालावी म्हणून कच्चा माल सरकारने उपलब्ध करून द्यावा म्हणून माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शहरात तब्बल १४ दिवस धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कामगारांनी या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे पेपर मिल अडचणीत आल्याची काही कामगारांची धारणा होती. वेतनात विलंब त्यांच्यामुळेच होत असल्याचा आरोपही काहींनी केला होता. मात्र प्रकरण वेगळेच होते. सरकारची भूमिका सहानुभूतीची व सहकार्य करण्याची असताना अंग काढून घेतल्याची होती. परिणामी जिल्ह्यातील पेपर मिल उद्योगासह अनेक उद्योग डबघाईस आले आहेत. याचा परिणाम कार्यरत कामगारावर झाला आहे. याकडे राज्य शासन आता तरी लक्ष देईल का, अशी चर्चा सुरू आहे. शहरात यज्ञाचीच चर्चा येथे कार्यरत १० हजारावर कामगारावरचे संकट दूर करण्यासाठी चक्क पेपर मिल परिसरात यज्ञ करण्यात आले. सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर मानवी स्वभाव देवाकडे धावा करतो. याची प्रचिती बल्लारपूर पेपर मिलमधील यज्ञातून येते. बुधवारी दोन दिवसांच्या यज्ञाची सांगता झाली असून कामगारासह हजारो भाविकांनी येथील महाप्रसादाचा लाभ घेतला.
पेपर मिलवरील अरिष्ट दूर करण्यासाठी पुगलियांच्या पुढाकारात नवचंडी यज्ञ
By admin | Published: January 12, 2017 12:34 AM