कोरपना : राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांच्या अध्यक्षतेखाली कोरपना येथे महागाई विरोधात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाच्या धोरणाने या देशातील शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली आहे. मागील १२० दिवसांपेक्षा ही अधिक दिवस शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत उद्योजकांच्या दारावर शेतकऱ्यांना नेऊन ठेवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे एवढी भाववाढ झाल्याने जनसामान्य नागरिकांचे कंबरड मोडले आहे. देशांत बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असून दोन कोटी नोकऱ्या देणारे सरकार फसवी घोषणा करून हातातील रोजगारसुद्धा हिरावला आहे. अनेक राष्ट्रीयकरण झालेल्या शासकीय मालमत्ता खासगीकरणाच्या नावावर मोठ्या उद्योगपतीच्या घशात घातल्या जात आहे. डिझेल पेट्रोल व जीवनावश्यक वस्तू भाववाढ झाल्याने सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या केंद्र शासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध करून या अनुषंगाने निवेदन कोरपना तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण निमजे, आबिद अली,शरद जोगी, कल्पना निमजे,
प्रवीण काकडे, प्रवीण मेश्राम, रफिक निजामी, नगरसेवक सोहेल अली, विनोद जुमडे, प्रवीण जाधव, विकास टेकाम, भाऊराव डाखरे, नथुजी लोंढे, बंडू वडस्कर, अतुल सौदागरे, मोबीन बेग, भिमराज धोटे, धनराज जीवने आदी उपस्थित होते.