पी. एम. मुरंबीकर : तपासणी व समुपदेशन कार्यक्रमलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिकलसेल कार्यक्रमातंर्गत जागतिक सिकलसेल दिनानिमित्त सिकलसेल तपासणी व समूपदेशन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आले. सिकलसेल आजार हा अनुवांशिक आहे. या आजारातून कोणताही सिकलसेल रुग्ण व व्यक्तीमुक्त होऊ शकत नाही. मात्र या आजारावर नियंत्रण आणता येते. पुढील पिढीत हा आजार टाळता येतो. तसेच लग्न जुळवताना जन्मकुंडली न जुळवता सिकलसेल तपासणी कुंडली जोडूनच लग्न ठरवावे. याकरिता सिकलसेल आजार नियंत्रणाबाबत जनतेने जागृत व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुनघाटे होते. यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत हजारे उपस्थित होते. सिकलसेल रुग्णांनी सर्व ऋतूत भरपूर पाणी प्यावे, पाणी हेच सिकलसेल रुग्णांकरिता मोठी औषधी आहे. त्यामुळे रुग्णांना होणाऱ्या वेदना व इतरही आजार टाळता येतात. सिकलसेल रुग्णांनी नियमित औषधोपचार व आरोग्याची काळजी घेतल्यास सिकलसेल रुग्णांचे सामान्य माणसासारखेच आयुष्यमान वाढू शकते. तसेच सिकलसेल रुग्णांनी शासनाच्या मोफत रक्तपुरवठा व उपचार, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६०० रुपयांची मदत, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, शासकीय रुग्णालयात सिकलसेल आजारावर उपलब्ध सोईसुविधा, एचपीएलसी सिकलसेल आरोग्य तपासणी फाईल, सिकलसेल ओळखपत्र, गर्भजल परिक्षण, सिकलसे डे-केअर सेंटर, टेलिमेडीसीन सेंटर, सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी एका तासाला २० मिनिटे जास्त वेळेची सवलत आदी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक संतोष चात्रेशवार यांनी केले. कार्यक्रमात ३२ सिकलसेल रुग्णांची तपासणी करण्यात आली. आभार प्रदर्शन तालुका पर्यवेक्षक शकील शेख यांनी केले. समुपदेशनाकरिता भारती तितरे व तपासणीकरिता तंत्रज्ञ अर्चना गावंडे यांनी सहकार्य केले.
सिकलसेल आजार नियंत्रणासाठी जागृती आवश्यक
By admin | Published: June 24, 2017 12:42 AM