लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दारुबंदीनंतरही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री सुरु आहे. मात्र अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दारुबंदी रोखण्यासाठी कठोर अमंलबजावणीची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री संजय देवतळे यांनी केले.धनगर समाज संघटनेच्या वतीने नागभीड येथील पोलीस उपनिरिक्षक चिडे यांना श्रद्धांजली अर्पण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, डॉ. विजय देवतळे, संजय बोधे, जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, धनगर समाजाचे तालुका अध्यक्ष प्राचार्य गजानन शेळके, तहसीलदार बोडखे, डॉ. कपिल टोंगे, मनिष जेठाणी, बंडू डाखरे, अॅड. जयंत ठाकरे, प्रा. पिसे, रुपलाल कावळे, पडवे, राजेंद्र मर्दाने आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विजय देवतळे म्हणाले, जिल्ह्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाकडे वळला असून आता गुन्हेगारी नवीन रूप घेत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी सबधित विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले. तर अॅड. टेमुर्डे म्हणाले, सद्यास्थितीत कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे स्त्रियावरील अत्याचारातसुद्धा वाढ झाली आहे. अवैध दारुविक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.तर लक्ष्मण गमे म्हणाले, छत्रपती चिडे यांच्यावर गुन्हेगारांना पकडताना मरणाची वेळ येणे, ही अत्यंत दुर्देवी बाब असल्याचे सांगितले. तर गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते दारू तस्करांना रोखण्याचा यापुढे प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य शेळके यांनी छत्रपती चिडे यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडत त्याचे स्मारक बांधण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन पंडीत लोंढे यांनी केले. यावेळी अनेकांची उपस्थित होते.
दारुबंदीच्या अमंलबजावणीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:32 PM