दूरसंचार सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी
नागभीड : येथील दूरसंचार विभागाची सेवा अनियमित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेरी येथे एक राष्ट्रीयीकृत बँक, सीडीसीसी बँक शाखा आहेत. त्यांना नेटवर्कअभावी फटका बसत आहे.
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे
वरोरा : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व विटाभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळावू लाकूड देण्याची मागणी कुंभार समाजबांधवानी केली आहे.
शासकीय कार्यालये कोरपना येथे आणावी
कोरपना : तालुका वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शाखा अभियंता पकडीगुडम सिंचन प्रकल्प, हिवताप निर्मूलन आरोग्य उपपथक कार्यालये गडचांदूर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नांदा फाटा येथे आहे. सदर कार्यालय एकाच ठिकाणी कामे होण्यासाठी कोरपना मुख्यालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कोरपना येथे स्थानांतर करण्याची मागणी केली जात आहे.
दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्योग आहेत. मात्र उद्योग परिसरातील गावांचा आजही विकास झाला नाही. त्यामुळे उद्योगांनी गावांना दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. तर मूल, सावली, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यात उद्योग नसल्याने येथे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : चंद्रपूर-कोरपना-आदिलाबाद आंतरराज्यीय व वणी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील सोनुर्ली ते देवघाट, कोठोडा व वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी(खुर्द) दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करताना वाहनाचलकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
तुकूम परिसरातील नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. तुकूम परिसरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने संताप व्यक्त केला जात असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र काही उपद्रवी नागरिकामुळे या योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सावलीत नियमित पाणीपुरवठा करावा
सावली : येथील जल प्राधिकरण योजनेद्वारे करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमीत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मोर्चा काढूनही ही समस्या सुटली नाही. रस्त्याच्या बांधकामामुळे पाईपलाईन फुटली, असे सांगून वेळ मारुन नेण्यात येते. मात्र याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.