तलाव संवर्धन समितीतर्फे नगरपालिकेला निवेदन
भद्रावती: येथील प्राचीन ऐतिहासिक डोलारा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने शहरातील नागरिकांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या डोलारा तलाव संवर्धन समितीच्या वतीने नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन तलावाचे संवर्धन करण्याची मागणी केली.
या तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न चालू असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले.
पुणे शहराच्या पर्यावरण आणि सौंदर्याच्या दृष्टीने प्राचीन ऐतिहासिक तलाव अग्रगण्य आहे. या तलावात प्राचीन ३४ खांबी दगडाचा पूल आहे. नागपूर- चंद्रपूर या मार्गालगत हे तलाव शहरीकरणामुळे अतिक्रमण होऊन लहान होत चालले आहे. ते असेच राहिल्यास पूर्ण तलावच अतिक्रमणाच्या विळख्यात गेल्याशिवाय राहणार नाही. शेवटी तलावाचा इतिहासच शिल्लक राहील. या तलावामुळे शहराची पाण्याची पातळीसुद्धा चांगली राहत होती. परंतु, अतिक्रमणाने पावसाच्या पाण्याचा अडथळा निर्माण होऊन तलावात न जाता इतरत्र जात आहे. आजच्या स्थितीत तलाव कोरडे पडले आहे. भूजल पातळीसुद्धा खूपच खाली गेली आहे. याचा विचार करता इको प्रोच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन इको प्रोचे जिल्हाध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या उपस्थितीत डोलारा तलावात चिंतन बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. तिथे तलाव संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. २६ मार्चला नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना निवेदन दिले. यावेळी डॉ. विवेक शिंदे, गुणवंत कुत्तरमारे, विशाल गावंडे, भिकमचंद बोरा, केशव मेश्राम, पुरुषोत्तम मत्ते, दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, शरद लांबे, मुकेश मिश्रा, इको-प्रोचे संदीप जीवने, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर, शुभम मेश्राम, हनुमान घोटेकर, सुनंदा खंडाळकर, विश्रांती उराडे, स्वाती चारी, वर्षा पडाल आदी उपस्थित होते.