चंद्रपूर : घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. वनविभागातर्फे सरपणासाठी मिळणारे निस्तार हक्काचे जळावू बिटसुद्धा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे रॉकेलचा वापर वाढला आहे. मात्र, जिल्ह्याच्या रॉकेल कोट्यात कपात झाल्याने लाभार्थ्याला कमी रॉकेल दिला जात आहे. त्यामुळे अनेकांना इंधनाचा प्रश्न भेडसावत आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. केरोसीन कोट्यात कपात झाल्याने एका शिधापत्रिकेवर पाच लिटर रॉकेल ऐवजी केवळ दोन ते तीन लिटर रॉकेल मिळत असल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.ग्रामीण परिसरामध्ये घरगुती वापरासाठी इंधन म्हणून रॉकेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. घरगुती गॅसच्या किंमती गगणाला भिडले आहेत. तर आॅनलाईन प्रणालीमुळे अनेकांना वेळेवर गॅस सिलींडर मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रॉकेलवरच अवलंबून राहावे लागत आहे. अशीच स्थिती इतर तालुक्यातही असून अनेक गावांमध्ये वीज असूनसुद्धा विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे बऱ्याच गावातील वीज रात्रीच्या वेळी खंडित होत आहे. त्यामुळे अनेक गावामध्ये स्वयंपाक तसेच रात्रीच्या उजेडासाठी रॉकेलचा उपयोग करण्यात येत आहे.ग्रामीण भागातील रॉकेलचा पुरवठाच नगण्य झाल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात रॉकेलची साठेबाजी व काळ्या बाजाराला उत आला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. तालुक्यात रॉकेलसाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे.रॉकेल आले तरी ते अत्यल्प प्रमाणात मिळत असल्याने त्याचा फारसा उपयोग नागरिकांना होत नाही. त्यामुळे रॉकेलअभावी रोजच्या स्वयंपाकाचीही अडचण निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांना वनविभागातर्फे निस्ताराचे जळावू बिटसुद्धा वेळेवर देण्यात येत नसल्याने सरपनाचा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याचा विपरीत परिणाम अवैध वृक्षतोडीवर होत आहे. मात्र वनविभागाचे कर्मचारी नागरिकांना मज्जाव करीत आहेत. यापूर्वी पोंभूर्णा येथे २ हजार ६४० कार्डधारकांसाठी पाच दुकानदारांकडून १८ हजार लिटर रॉकेल वितरीत केले जायचे. मात्र आता केवळ साडे चार ते पाच हजार लिटर रॉकेलचा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांना एका कार्डवर दोन ते तीन लिटर पेक्षा जास्त रॉकेल लाभार्थ्याला मिळत नाही. ग्राहकांचे कमी रॉकेलमध्ये भागत नसल्याने विक्रेत्याकडून जास्त रॉकेलची मागणी करतात. त्यातून दुकानदार व ग्राहकांमध्ये किरकोळ वाद निर्माण होत आहे. या प्रकारामुळे ग्राहक आणि दुकानदारही त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
रॉकेल कोट्यातील कपातीने गरज भागेना
By admin | Published: October 21, 2014 10:49 PM