बल्लारपूर : शहर मागील तीन महिन्यापासून कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. रोज १०० च्या जवळपास कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे प्रशासन सांगत आहे. परंतु नगरपरिषदेने कोरोना धास्ती घेतली नसून कोरोनाचा दुसरा टप्पा जाहीर झाल्यापासून शहरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. संपूर्ण शहरातील प्रत्येक वॉर्डात फवारणी करण्याची मागणी नागरिक करीत आहे.
बल्लारपूर तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गावखेड्यातील नागरिक जागरूक होऊन आरटीपीसीआरची चाचणी स्वतः होऊन करीत आहेत. तालुक्यातील ३२ गावामध्ये १८ गावात कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे तेथील ग्रामपंचायतने गावाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी सुरु केली आहे. बल्लारपूर शहर मोठे आहे यात रोजचे बाधितांची संख्या वाढत असताना नगरपरिषद मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेत नाही. मागच्या वर्षी फवारणी करण्याची मशीन आणून शहर निर्जंतुकीकरण केले व चांगली कामगिरी केली. परंतु ती मशीनही अनेक महिन्यापासून नादुरुस्त आहे. शहरात नालीमध्ये फवारणी करण्याचे पंपही नादुरुस्त असल्याचे सफाई कामगार सांगतात. शहरात मच्छरांचा नायनाट करणारी फागिंग मशीनने फवारणी करणेही एक वर्षांपासून बंद आहे. नगरपालिकेने त्वरित शहराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुढाकार घेऊन कोरोना संकट टाळावे, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
मागील वर्षी कोरोना संकटाचे वेळी मुख्याधिकारी यांनी संपूर्ण शहराची फवारणी केली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट अनेकांना बाधित करीत असताना नगरपरिषद निर्जंतुकीकरण का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.