नागभीड : कोरोनाने शहरात चांगलेच तांडव मांडले आहे. शहरात कोरोनाचे रोज पाच-दहा रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. काही वसाहती कोरोनाने चांगल्याच प्रभावित झाल्या असून, प्रत्येक प्रभागात पाच-दहा रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. अशा परिस्थितीत नगर परिषदेने पुढाकार घेऊन अग्निशमन यंत्रांच्या साहाय्याने संपूर्ण शहरात जंतुनाशकाची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
मागील वर्षी शहरात पहिल्यांदा ३ जून रोजी कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यावेळी शहरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. नगर परिषद प्रशासनाने त्वरेने हालचाली करून लागलीच तो परिसर सील केला व प्रतिबंधात्मक औषधांची तत्परतेने फवारणी केली. त्या परिसरात अवागमनावर निर्बंध घालण्यात आले. त्या बाधिताच्या संपर्कात आलेल्या नोंदी घेण्यात आल्या. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. ज्या ज्या परिसरात रुग्ण आढळून आले, त्या त्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाय व फवारणी करण्यात आली. फवारणी आताही सुरूच आहे; पण आता घराघरांत रुग्ण मिळत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात कोरोनाविषयी दहशत निर्माण झाली आहे.
नागभीड शहराच्या भोवती अनेक वसाहती आहेत. या वसाहतींमध्येही रुग्णांची संख्या फोफावत आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे येथील मुसाभाईनगर अगोदरच सील करण्यात आला आहे. मुसाभाई नगरसारखीच येथील काही वसाहतींचीही अवस्था आहे. वसाहतीच नाही तर मुख्य शहरही चांगलेच बाधित आहे. म्हणूनच नगर परिषद प्रशासनाने अग्निशमन दलाच्या सहकार्याने संपूर्ण शहरात एकाचवेळी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.