राजुरा तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ पसरली आहे. विहीरगाव येथे महिनाभरात १५ जणांचा मृत्यू कोरोनाने झालेला आहे. देवाडा आरोग्य केंद्राअंतर्गत मंगी(बुज.), चंदनवाही, पांढरपौनी, पाचगाव, हरदोना, मुठरा, खामोना, अहेरी, टेंबुरवाही, विरूर रोड, भेदोडा इत्यादी गावांमध्ये तापाने थैमान घातले आहे. आरोग्य केंद्र विरूर स्टेशनअंतर्गत, चिंचोली, कविटपेठ, धानोरा, सुब्बई या गावांमध्ये तापाची साथ पसरलेली असून, या गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक झाले आहे. गोवरीसारख्या गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने, येथील तापाची साथ नियंत्रणात आलेली आहे. लोकांना आरोग्य विषयक मूलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने कोरोनाचा प्रसार हा वाढतो आहे. लाॅकडाऊनमुळे लोकांचा रोजगारही बुडालेला आहे. शेतीतील कामे वेळेवर होत नसल्याने गावकरी संभ्रमात पडलेले आहेत. यंदाचा हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी पडले आहेत. यात तापाने भर घातलेली आहे.
या ग्रामीण भागाकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज असून, गावोगावी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष रोशन येवले, संस्थापक सदस्य मिलिंद गडडमवार, विधानसभा अध्यक्ष प्रदीप बोबले, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल कोहपरे, संघटनमंत्री पवन ताकसांडे, सचिव तुळशीराम कन्नाके आदींनी केली आहे.