बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. या तालुक्यात शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्राचा समावेश आहे. नुकतेच शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघिणीने धुमाकूळ घालून दोन महिला व एका पुरुषावर हल्ला करून ठार केले तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त होणे स्वाभाविक आहे. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघीणीला पकडा असा आदेश वन अधिकाऱ्याला दिले तर ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मागील दोन वर्षांपासून शिवणी व सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघ व बिबट यांच्याकडून मानवावर हल्ल्याच्या घटनात वाढ होत आहे. भयभीत जनता आणि वनविभाग यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु, मानवाकडून वाघाचे खाद्यान्न व आश्रय स्थळ नष्ट होत आहेत. त्यामुळे वाघ व बिबट यांनाही जीवन जगावे कसे, ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सिंदेवाही व शिवणी वनविभागात निसर्गाने घनदाट जंगल उपलब्ध करून दिलेले आहे. सर्व प्रकारची वन औषधी, वनफळे, इमारती लाकूड, बांबू व वन्यप्राणी या वनविभागात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी काही टक्के वनक्षेत्र वनविकास महामंडळाच्या ताब्यात आहे. अलिकडच्या काळात वन्य प्राण्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली आहे. सिंदेवाही व शिवणी वनविभागात वाघ व बिबट यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. रात्रीच्या वेळेस वन्य प्राण्यांची भटकंती सुरू असते. या भटकंती दरम्यान वाघाच्या तावडीत कधी-कधी पाळीव जनावरांची शिकार होत आहे. लोकांचाही वावर जंगलात वाढत असल्याने वाघाचे दर्शन ग्रामीण भागात नित्याचेच झाले आहे. सरपणासाठी गेलेल्या महिला किंवा गुणे चारणाऱ्या गुराख्यावर वाघ कधी-कधी हल्ला चढवितो. याला काही मानवी चुका कारणीभूत ठरत आहे.वनपरिक्षेत्रात दरवर्षी वनविभाग व वनविकास महामंडळाकडून रोपवनाचे कामे केली जातात. रोपवनाच्या नावाखाली नैसर्गिक घनदाट जंगलातील झाडे तोडली जातात तसेच दुर्मिळ वन औषधी, वनफळे, मोह, टेंभूर्णी व आवळा यासारख्या मौल्यवान झाडे सर्रासपणे तोडली जात आहेत. ही वनफळे अस्वल, चित्तर, सांबर व माकड यासारख्या वन्यप्राण्याची भूक भागविते तर झुडपी, गवती झाडे तोडल्याने निलगाय, रानगवे, ससा, जंगली डुक्कर आदी वन्य प्राण्याची उपासमार होत आहे. रोपवनासाठी जंगल सफाई होत असल्याने घणदाट जंगल विरळ होत आहे. कुकडरांजीची झाडे गोलाकार आकाराची असून आतमध्ये पोकळी राहते. त्याठिकाणी वन्य प्राण्याचे आश्रय स्थळ होते. परंतु सुरगाडीच्या नावाखाली शेतकऱ्यांना परमिट देवून वनविभागाने कुकडरांजीच्या झाडाची कत्तल केली. साग रोपवनामुळे त्या क्षेत्रातील इतर गवती वनस्पतीची वाढ होत नाही. सागर झाडापासून कोणत्याही वन्य प्राण्यांना खाद्य मिळत नाही. फळ वर्गीय झाडाची कमतरतेमुळे प्राणी गावाकडे कुच करीत आहेत.
मानवावरील वाघाचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज
By admin | Published: February 09, 2017 12:43 AM