दुर्गापूर : प्रत्येक व्यक्ती गीतांच्या माध्यमातून रसमय जीवन घडविण्याचा प्रयत्न करतो. संगिताच्या माध्यमातून आचार व विचार, सकारात्मक दृष्टीकोन घडविण्याचा प्रत्येकांनी प्रयत्न करून या देशाचे भावी नागरिक असणारे आपल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना योग्य संस्कार देण्यासाठी, जीवनात योग्य ताल-लय जुळवून घेण्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांनी जगण्याची योग्य दिशा ओळखून देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देण्यासाठी, सर्व धर्म समभाव, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, मानवमुक्ती यासाठी शालेय विद्यार्थी व सर्व शिक्षक व इतरही नागरिकांना गीतांच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकविण्यासाठी मोठा आधार म्हणजे गीतमंच होय, असे प्रतिपादन चंद्रपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजय रामटेके यांनी केले.विद्या परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ, जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या पत्रानुसार आयोजित चंद्रपूर तालुकास्तरीय गीतमंच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. गटशिक्षणाधिकारी अजय रामटेके यांनी देशभक्त शामलाल गुप्ता, गिरीजाकुमार माथूर, प्रदीप, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, सुरेश भट, साने गुरुजी, भा.रा. तांबे, बहिणाबाई चौधरी, जगदीश खेबुडकर, गोविंदाग्रज, कुसूमाग्रज यांच्या निवडक कविता व गीतांचा उल्लेख करून मानवी जीवनात संस्कारमय गीतांचे महत्व पटवून दिले.नुकतेच चंद्रपूर तालुक्यातील प्रत्येक जि.प. शाळेतून एका शिक्षकाचे गीतमंच प्रशिक्षण जि.प. उच्च प्राथमिक शाळा उर्जानगर व खुटाळा येथे पार पडले. अतिथी व मार्गदर्शक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव मडावी, शिक्षण विस्तार अधिकारी लता कुळसंगे, केंद्र प्रमुख चिंदेश्वर गेडाम, रत्नमाला खोब्रागडे, मुख्याध्यापक वर्षा नळे, हिरकणी रायपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हे प्रशिक्षण खुटाळा व उर्जानगर येथे दोन-दोन बिटांच्या गटात घेण्यात आले.चंद्रपूर तालुकास्तरीय गीतमंच प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून किटाळीचे पदवीधर शिक्षक डॅनिअल देवगडे, नकोडाच्या शिक्षिका प्रज्ञा माहुरकर, वढोलीचे शिक्षक शुद्धोधन मेश्राम, खुटाळाचे शिक्षक शंकर आसमपल्लीवार व जटपुरा शाळेच्या शिक्षिका शैला गाडेवार यांनी आपल्या प्रभावी व सुरेल वाणीने गीतमंचातील निवडक गीतांचा दोनही टप्प्यात उत्कृष्ट सराव शिक्षकांकडून करवून घेतला व प्रत्येक शाळेत ‘एक सुर-एक ताल’ उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना संस्कारित करावे अशी प्रेरणा दिली.
संस्कृतीला टिकविण्यासाठी गीतमंचाची गरज
By admin | Published: October 25, 2014 1:11 AM