हक्काची जागा दुसऱ्याच्या ताब्यात : लोकसंख्येपेक्षा संख्याबळ कमी नेरी : एखाद्या इसमाने गुन्हा केल्यास ‘बिनभाड्याच्या खोलीत पाठवू काय’, असा उपरोधिक प्रश्न विचारला जातो. बिनभाड्याची खोली हा शब्द प्रयोग पोलीस स्टेशनसाठी वापरणे प्रचलीत आहे. परंतु नेरी येथील पोलीस चौकी सध्या किरायाच्या घरात सुरू आहे.पोलीस चौकीसाठी असलेल्या हक्काच्या जागेवर एका नागरिकाचे अतिक्रमण आहे. त्यामुळे स्वत:च्या हक्काच्या जागेसाठी या पोलीस चौकीचा संघर्ष सुरू आहे.चिमूर तालुक्यातील नेरी हे गाव सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावाशी परिसरातील ३४ गावे जोडली आहेत. नेरीची लोकसंख्या १७ हजारच्यावर असून आजुबाजूची सर्व गावे मिळून जवळपास एक लाख लोकसंख्या होते. या नागरिकांच्या संरक्षणाची व कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी नेरी पोलीस चौकीवर आहे. त्यामुळे १९९७ मध्ये पोलीस दूरक्षेत्र स्थापन करण्यात आले. तेव्हापासून या चौकीचा कारभार ग्रामपंचायतीच्या जागेवर किरायाने चालत आहे. ग्रामपंचायत नेरीला या भाड्यापोटी पोलीस विभागाकडून फक्त १५० रुपये दिले जातात. परंतु १५० रुपये धनादेश वटविण्याकरिता ग्रामपंचायतीला ३१ रुपयाचा खर्च करावा लागतो. यामुळे भाड्यातून ११९ रुपये उरतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने १९९ रुपये उत्पन्न देणाऱ्या भाड्याच्या खोलीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.मागील २० वर्षापूर्वीच महसूल विभागाने नेरी येथील नेरी-जांभुळघाट रोडलगतच आबादी प्लॉट पैकी भूमापन क्र. ७१० मधील ०.६३ हे.आर. जागा पोलीस विभाग चंद्रपूर या नावाने दिली आहे. नेरी येथे पोलीस चौकी बांधण्यासाठी ही जागा उपलब्ध असली तरी दुर्लक्ष व नियोजनाअभावी या जागेकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामत: पोलीस चौकी किरायाच्या इमारतीत आहे. या चौकीला हक्काची जागा मिळावी, अशी नेरीवासियांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)
नेरीची पोलीस चौकी किरायाच्या घरात !
By admin | Published: June 19, 2016 12:47 AM