वृक्षप्रेमी संस्थांनी लक्ष देण्याची गरज
बल्लारपूर : शहरात वेळोवेळी वसुंधरा दिन, वन दिन, पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या अनेक संस्था आहेत. परंतु कोरोना संकटकाळात या वृक्षांकडे लक्ष देणाऱ्या फार कमी संवेदनशील संघटना आहेत. म्हणूनच, शहरात रस्त्याच्या बाजूला वाकडी झालेली झाडे कोणाच्या नजरेत पडत नाही. नगर प्रशासनाच्याही नाही. यामुळे या वृक्षांची देखभाल कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात अनेक ठिकाणी बल्लारपूर नगरपालिकेने महागडे वृक्षारोपण केले. पण, त्यांचे संवर्धन करण्याची गरज त्यांना भासली नाही. काही ठिकाणी वाहनांनी काही झाडांना धडक देऊन अर्धमेले केले आहे. परंतु, अशा झाडांना टेकू देऊन सरळ करण्याचे धाडस नगर परिषद कर्मचारी किंवा ज्यांच्याकडे झाडांवर निगा राखण्याची जबाबदारी आहे, ते करीत नाही. वृक्षमित्र, पर्यावरणप्रेमी फक्त नामधारी आहेत. अशा वृक्षांना मदत करण्यास त्यांनी समोर यायला पाहिजे. वस्तीकडे जाणाऱ्या गोलपुलाजवळ व जुन्या अग्निशमन दलाजवळ असेच वृक्ष कोलमडून पडलेले आहे. त्यांना सरळ करण्याची तसदी कोणी घेणार काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे.
कोट
कोरोनाच्या संकटात प्राणवायूचे महत्त्व फार वाढले आहे. कोविड सेंटरवर ऑक्सिजन कमी पडत आहे. अशात सर्वांनी ऑक्सिजन देणारे वृक्ष व त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- सीताराम सोमाणी, सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर