आशिष देरकर
कोरपना : सिमेंट उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यात एकूण चार सिमेंट उद्योग आहेत. औद्योगिक प्रगतीमुळे तालुक्याला महत्त्व प्राप्त झाले असले तरी या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या नशिबी उपेक्षाच असल्याचे दिसून येते.
कोरपना तालुक्यात विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या हजारोच्या संख्येत आहे. कामगार हा उद्योगाचा कणा असतो. मात्र कामगारांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात कंपनी प्रशासन व कंत्राटदार वर्ग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. कोरोनाचा काळ हा कामगारांसाठी कर्दनकाळ ठरला. कामगारांच्या परिवाराचे संपूर्ण आर्थिक संतुलन कोरोनाच्या काळात बिघडले. कामगारांना कधी नव्हे इतका संघर्ष कुटुंबाचा गाढा हाकण्यासाठी या काळात करावा लागला. अशातच कंत्राटदारांनीसुद्धा आपापल्या परीने कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचे निदर्शनास आले.
बॉक्स
मागील वर्षीचे हजेरीपट पाहून दिले काम
२२ मार्च २०२० पासून संचारबंदी करण्यात आली. २२ मार्च ते ३१ मार्चपर्यंत कामगारांना पूर्ण पगारी रजा देण्यात आल्या. मात्र एप्रिलपासून काम देताना कंत्राटी कामगारांचा एप्रिल २०१९ चा हजेरीपट बघून काम देण्यात आले. मागील एप्रिल महिन्यात १० दिवस कामावर असेल तर, चालू एप्रिल महिन्यातसुद्धा केवळ १० दिवस काम देण्यात आले. कामगारांची काम करण्याची क्षमता असतानाही त्यांना कामावर घेण्यात येत नव्हते. त्यामुळे तुटपुंज्या पगारात काम करावे लागले.
बॉक्स
धान्याचीही मदत नाही
कोरोना काळात सर्वच सिमेंट कंपन्यांनी सामाजिक ऋण निधींतर्गत आजूबाजूच्या गावांतील गरीब कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धान्याची मदत केली. मात्र हाताला काम नसणाऱ्या कामगारांना कंपन्यांनी धान्य दिले नाही.
बॉक्स
व्यवस्थापनाशी लढायला शक्ती आणायची कुठून?
आपल्याला आपला अधिकार मिळावा यासाठी कंपनी प्रशासनासोबत भांडायची कामगारांची शक्ती नसते. कंपनीने आपल्याला कामावरून कमी केल्यास आपले कुटुंब उघड्यावर येईल, या भीतीने अनेक कामगार कंपनी प्रशासनाविरोधात आपल्या हक्कासाठी आवाज उठवत नसल्याचे दिसते.
कोटगडचांदूर येथील सिमेंट कंपनी रात्रीच्या सुमारास धूर सोडत असल्याने गडचांदुरात घरांवर धुळीचा खच साचलेला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा कंपन्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
- विक्रम येरणे, नगरसेवक, न. प. गडचांदूर.
कोट
सिमेंटच्या धुरामुळे वेगवेगळे आजार होतात. धुरांमध्ये विविध विषारी रासायनिक पदार्थ हवेद्वारे सोडले जातात. त्यामुळे संथ गतीने विष शरीरात जात आहे. अशा रुग्णांमध्ये सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे.
- डॉ. कुलभूषण मोरे, संचालक : अर्थ फाउंडेशन, गडचांदूर