कोरपना : तालुक्यातील वनाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले वनसडी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय साठ वर्षांपासून एकाच इमारतीत आहेत. त्यामुळे आधुनिक स्वरूपात नवीन इमारत व कर्मचाऱ्यांच्या सदनिका बांधण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.
१९६२ला या सर्व इमारती बांधण्यात आल्या, तेव्हापासून संपूर्ण प्रशासकीय कारभार येथूनच चालतो आहे. दीड ते दोन एकर परिसरात असलेल्या या सर्व इमारती आता जीर्ण झाल्या आहे, तसेच कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अपुऱ्या पडते आहे. त्यामुळे सुसज्ज इमारती बांधण्यात याव्या, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सदर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा असल्याने निसर्गरम्य आहे. यातील काही इमारती मोडकळीस आल्या, तरी अनेक इमारती आजही उत्तम वास्तू वैभवाची साक्ष देत आहेत. त्यांना कायम ठेऊन नव्या इमारतींची उभारणी करण्यात यावी, ज्यामुळे भावी पिढीला ही स्थापत्य कला बघता येईल, अशी मागणी आहे.