सामान्य रुग्णालयातील प्रकार : आरोग्य विभागाने दखल घेण्याची मागणी चंद्रपूर : प्रसुतीची तारीख जवळ असल्याने आठ दिवसांपूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जयश्री किशोर शेंडे ही गर्भवती महिला दाखल झाली. तिने वारंवार तक्रार करूनही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि वेळेत प्रसुती केली नाही. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री तिची प्रसुती होताच नवजात बाळ दगावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगलीच खळबळ माजली आहे.स्थानिक श्यामनगरमधील जयश्री किशोर शेंडे ही महिला आवडाभरापूर्वी प्रसुतीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक ९ मध्ये भरती झाली होती. मात्र प्रसुतीची तारीख निघून गेल्यानंतरही प्रसुती झाली नाही. त्यामुळे रोज तिची चिंता वाढत होती. तिच्या नातेवाईकांनी प्रसुतीबाबत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी विचारपूस केली तर नागपूरला रेफर करण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे वारंवार तक्रार करूनही कोणीही ऐकायला तयार नव्हते. काही कर्मचाऱ्यांनी जयश्रीच्या नातेवाईकाकडे प्रसुतीसाठी पैशाचीसुद्धा मागणी केली. नाजूक परिस्थितीमुळे खासगी रूग्णालयात पैसा खर्च करू शकत नाही म्हणून सामान्य रुग्णालयात भरती केले तर तिथेही पैशासाठी तगादा लावला जातो, अशा परिस्थितीत सामान्य माणसांनी उपचार करावा कुठे म्हणून नातेवाईक शांत झाले. अखेर मंगळवारी मध्यरात्री जयश्री शेंडेची प्रसुती झाली. मात्र काही मिनिटातच नवजात बाळ दगावले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जयश्रीचे पती किशोर शेंडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एस. मोरे यांच्याकडे थेट तक्रार केली. मोरे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत वार्ड क्रमांक ९ ची प्रत्यक्ष पाहणी केली. (स्थानिक प्रतिनिधी)अधीक्षकांना चौकशीचे आदेश कोण कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते या प्रकरणी दुपारी ४ वाजता मोरे यांनी बैठक घेतली आणि अधीक्षक डॉ.यू.व्ही. मुनघाटे यांना चौकशीचे आदेश दिले.
डॉक्टरांच्या दुर्लक्षतेमुळे नवजात बाळाचा मृत्यू
By admin | Published: May 04, 2017 12:42 AM