पत्रकार परिषदेत मागणी : अन्यथा आंबेडकरी जनता प्रवेशद्वार तोडून लोकवर्गणीतून बांधेल भद्रावती : येथील नगर परिषदेने पर्यटन विकास निधीच्या माध्यमातून येथे बांधलेले दीक्षाभूमी प्रतिकृती प्रवेशद्वार विद्रुप स्वरुपाचे आहे. ते तोडून नव्याने बांधण्यात यावे, याकरिता नगर परिषद प्रशासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र आजही त्यावर कोणताच निर्णय न घेतल्याने नगर परिषद प्रशासनाचा आंबेडकरी जनतेचा अपमान करण्याचा हेतू दिसून येतो. १४ आॅक्टोबरच्या आत पालिकेने कोणतीच हालचाल न केल्यास विद्रुप स्वरुपाचे प्रवेशद्वार आंबेडकरी जनता स्वत:च तोडेल, याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत भद्रावती बौद्ध समन्वय समितीचे अध्यक्ष उमेश रामटेके यांनी दिला.बसस्थानकावरील डॉ. आंबेडकर चौकात पत्रकार परिषद घेण्यात आली. माहिती देताना रामटेके म्हणाले, प्रवेशद्वारासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे व त्या परिसरातील सौंदर्यीकरण, विंजासन बौद्ध लेणीकडे जाणाऱ्या मार्गाने बांधकाम, ऐतिहासिक बौद्ध लेणीच्या परिसरात पर्यटकांसाठी निवासस्थान व स्वच्छतागृहे यांचे बांधकाम यावरील प्रश्न उपस्थित करण्यात आले. पर्यटन विकास निधी व नगरोत्थान विकास निधीच्या माध्यमातून शहरात चार प्रवेशद्वार उभारण्यात आली. यात शहराच्या मुख्य मार्गावरील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, जैन मंदिराचे प्रवेशद्वार, गवराळा गणेश मंदिराचे प्रवेशद्वार, विंजासन बौद्ध लेणीकडे जाणाऱ्या दीक्षाभूमी प्रतिकृती प्रवेशद्वार यांचा समावेश आहे. परंतु तीन प्रवेशद्वार वगळता दीक्षाभूमी प्रतिकृती प्रवेशद्वाचे अत्यंत विद्रुप स्वरुपाचे बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत आंबेडकरी जनतेने नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु यावर कोणताचा निर्णय घेण्यात आला नाही. हा आंबेडकरी जनतेचा अपमान असून हे प्रवेशद्वार १४ आॅक्टोबरच्या आत नगर परिषदेने तोडून नव्याचे बांधकाम न केल्यास आंबेडकरी जनता हे स्वत:च प्रवेशद्वार तोडून लोकवर्गणीतून बांधकाम करेल, असे उमेश रामटेके यांंनी सांगितले. नगरपरिषद प्रशासन हे भेदभाव वृत्तीने वागत असून विकास समतोल झाला पाहिजे. विंजासन लेणीच्या परिसराचे पुरातत्व विभागाने मोजमाप केल्यानुसार उरलेल्या खासगी परिसरात आपणास बांधकाम करता येईल, असे त्या विभागाने सांगितल्यानंतरही विकासात्सक काम करण्यात आले नाही. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक भेटीला येत असतात. परंतु त्यांच्या निवासाची व्यवस्था नसल्याचे सांगितले. याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष विशाल बोरकर, मारोतराव रामटेके, उमेशकुमार मैत्रेय, शंकर मून, नगरसेवक विजय मेश्राम, डॉ. भाऊराव राजदीप, जयदेव पाझारे, नारायण पाटील, रितेश वनकर, प्रणय रामटेके, कवि चालखुरे, प्रज्वल पेटकर, मितवा पाटील, वैभव पाटील, कपूरदास दुपारे, डॉ. नरेंद्र वाढवे, विजय वाखेडे, शंभरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
दीक्षाभूमी प्रतिकृती प्रवेशद्वार नव्याने बांधावे
By admin | Published: October 07, 2016 1:13 AM