नऊ सरपंचांनी दिला काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 06:47 PM2021-12-02T18:47:19+5:302021-12-02T18:57:20+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रपूर : निवडणुकीवेळी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ लाख रुपये देण्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले होते. मात्र, अद्यापही त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही. तसेच तालुका काँग्रेस कमिटीकडून कोणतेही काम होत नाही. या कारणाने ब्रम्हपुरी तालुक्यातील नऊ सरपंच व तीन उपसरपंचांनी सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिला आहे. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर या राजीनाम्यांनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
मागील सात-आठ वर्षांपासून तालुक्यात काँग्रेसची पकड मजबूत झाली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. चिमूर तालुक्यात काही गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी पालकमंत्र्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला विकासकामांकरिता २५ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्यापही ही रक्कम मिळालेली नाही. तसेच काँग्रेस कमिटीकडून कोणतीही कामे होत नाहीत, असा आरोप करत तालुकाध्यक्ष तिडके यांच्याकडे सरपंच, उपसरपंच यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यात संजय राऊत तोरगव बु, राकेश पिलारे कलेता, शरद अलोणे तोरागाव खु., सुधीर पिलारे बेलागाव, प्रवीण बांडे नांदगाव, सुरेश दुनेदार पिंपळगाव, राजू नान्हे काहाली, अर्चना डेंगे खंडाळा, प्रेमानंद गेडाम सोनेगाव या सरपंचांसह नरेश राऊत कालेता, नंदकिशोर रखडे खंडाळा या उपसरपंचांचा समावेश आहे.
स्थानिक आमदार विकासनिधीअभावी संबंधित गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली नाहीत. मात्र, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या निवेदनानुसार, या गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी इतर शासकीय विकासनिधीतून कामे मंजूर करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, विकासनिधी देण्यास विलंब झाल्याचे एकमेव कारण हे कोरोना संकटकाळात राज्याच्या तिजोरीत झालेला खडखडाट हे आहे.
तसेच ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी हे ब्रम्हपुरी व चिमुर विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या तालुक्यांतील सर्व गावांमधील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी यांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करत असतात. तालुका काँग्रेस कमिटीकडे काम घेऊन येणारे ग्रामस्थ हे कधीच निराश होऊन परतत नाहीत. त्यामुळे त्या ९ गावांतील सरपंचांनी दिलेले पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे राजीनामे तालुका काॅंग्रेस कमिटीने फेटाळले आहेत.
- खेमराज तिडके, तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी