विकास खोब्रागडे
चंद्रपूर : ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव परिसरात गेल्या नऊ दिवसांपासून एका वाघिणीचा व तिच्यापासून दुरावलेल्या बछड्याचा धुमाकूळ सुरू आहे. गावातील दोन गोऱ्ह्यांची त्यांनी शिकार केली आहे. त्यांना जंगलातून पिटाळून लावण्यासाठी वनविभागाचे पथक परिसरात गस्त घालत आहेत. मात्र बछड्यांपासून दुरावलेली वाघीण त्याच परिसरात नऊ दिवसांपासून होती. दरम्यान शुक्रवारी वाघिणीला तिचे बछडे मिळाले. तरीही वाघीण व बछडे त्याच परिसरात असल्याने गावकऱ्यांना धोका कायम आहे.
तत्पूर्वी या वाघिणीने दोघांना जखमीही केले आहे. त्यामुळे संपूर्ण पळसगाव आणि परिसर दहशतीखाली आला होता. एवढेच नाही तर जंगल परिसरातील शेतकऱ्यांनी शेतावर जाणेही काही दिवस बंद केले होते.
गोंडमोहळी येथील वासुदेव मसराम यांच्या शेतातील झुडपामध्ये भरदिवसा वाघाने ठाण मांडल्याचे अनेकांना दिसले होते. २९ जूनला रामभाऊ चौधरी यांच्या शेतशिवारात वाघाचे पगमार्क दिसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच ३० जूनला रात्री वाघिणीचा बछडा पळसगावातील ताराचंद गुळधे यांच्या घरी शिरणार तेवढ्यात ताराचंद यांना तो अंगणात दिसला. आरडाओरड केल्यानंतर बछडा पळून गेला. मात्र जाता जाता या बछड्याने एका गोऱ्ह्याची शिकार केली.
दरम्यान, गुरुवारी सिंदेवाही-चिमूर रोडवरील भडक पुलावर काम करणाऱ्या कामगारांना वाघीण आणि तिचे तीन बछडे दिसल्याचे सांगितले, आजपर्यंत वनविभागाच्या वतीने दोन बछडे वाघीणसोबत असल्याचे सांगितले जात होते, यावरून वनविभाग गावातील जनतेला चुकीची माहिती देत असल्याचे निदर्शनास आले आहे.