लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तालुक्यातील वातावरण चंदन वृक्षांसाठी प्रतिकूल असल्याने मागील अनेक दशकांपासून हे वृक्ष लागवड करण्यास कुणी धजावत नाही. मात्र, वरोरा येथील हरित मित्र परिवाराने शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी नऊ हजार वृक्षांची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला. तीन वर्षांपासून ही मोहीम सुरू असून चंदनाचे वृक्ष बघण्यासाठी अनेक गावांतील शेतकरी वरोरा परिसराला भेटी देत आहेत.वरोरा शहरातील किशोर उत्तरवार, स्वप्नील देवाळकर, अविनाश देवतळे व काही मित्र एकत्र येवून हरित मित्र परिवार संघटनेची स्थापना केली. वरोरा शहर व ग्रामीण भागात चंदन वृक्ष लावण्याचा संकल्प जाहीर केला. हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याकरीता इंटरनेट व वर्तमानाच्या माध्यमातून चंदन लागवड करण्यासाठी त्यांनी चंदन वृक्षतज्ज्ञांशी संपर्क साधला. अद्यायवत माहिती संकलित करून चंदनाची शेती बघण्यासाठी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याच्या तालुका निलंगा येथील होजूर हे गाव गाठून दत्तात्रय बगदुरे यांच्या बारा एकरातील चंदनाची शेती बघितली. मराठवाड्यात पाण्याची चणचण असतानाही ही शेती हिरवीगार असल्याचे पाहून युवक आनंदीत झाले. दरम्यान, बगदूर यांच्याकडून चंदन शेतीची संपूर्ण माहिती घेतली. वरोरा शहर व ग्रामीण भागात दोन हजार चंदनाचे रोपटे आणून जवळचे मित्र आणि शेतकऱ्यांना देण्याची मोहीम सुरू केली. परिणामी, आज वरोरा शहर व ग्रामीण भागात नऊ हजार चंदनाचे वृक्ष सात ते दहा फुट उंचीपर्यंत मोठी झाली आहेत. हे वृक्ष डौलाने उभे असल्याचे दिसत असून चंदनाचे रोपटे दिलेल्या घरी व शेतात हरित मित्र परिवाराचे सदस्य प्रत्येकाच्या घरी जावून वृक्ष संगोपनाची माहितीही नि:शुल्क दिली जात आहे. चंदन वृक्षाच्या गाभ्यापासून विविध मूर्त्या तयार करता येतात. सौंदर्य प्रसाधनातही वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. चंदनाचे तेल बहुउपयोगी आहे. संस्कृतमध्ये चंदन वृक्षाला ‘शर्विलक’ असे म्हणतात. याचा अर्थ चंदनाचे वृक्ष स्वत:च्या वाढीकरिता इतर वृक्षाच्या मुळातून अन्न घेतो, असा होतो. चंदनाच्या वृक्षांची वनविभागात व सातबारावर नोंद करणे आवश्यक असून या वृक्षाबाबत पसरलेले गैरसमजही दूर होत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात नऊ हजार चंदन वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 2:19 PM
वरोरा येथील हरित मित्र परिवाराने शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणी नऊ हजार वृक्षांची लागवड करून नवा आदर्श निर्माण केला. तीन वर्षांपासून ही मोहीम सुरू असून चंदनाचे वृक्ष बघण्यासाठी अनेक गावांतील शेतकरी वरोरा परिसराला भेटी देत आहेत.
ठळक मुद्देशेतकरी देत आहेत भेट प्रतिकूल हवामानातही हरित सेनेचे धाडस