लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर केले. हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. बाजारपेठा उघडल्या.मात्र शाळा, महाविद्यालये आठ महिन्यांपासून बंदच आहे. आता शासनाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये उघडण्याची परवानगी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सोमवारपासून शाळांची घंटा नियमित वाजणार आहे.शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.त्यानुसार येथील शिक्षण विभागाने ज्या शाळा सुरू होणार आहे, त्यांचे निर्जंतुकीकरण करण्याचे बजावले होते. त्यामुळे सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शाळेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थर्मल स्कॅनर, पल्स आॅक्सीमीटर, हात धुण्यासाठी साबन व पाणी आदींची सुविधा ठेवण्यात आली आहे. तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण दररोज करण्यात येणार आहे. याशिवाय शाळेत कोणत्याही विद्याथ्यार्ला लक्षणे दिसली तर त्याला घरी पाठविले जाणार आहे.खासगी शाळांचा टेस्टसाठी विद्यार्थ्यांना फतवाशाळा सुरू करण्यापूर्वी शासनाने शिक्षकांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र विद्यार्थ्यांना चाचणी करणे बंधनकारक नाही. तरीही चंद्रपुरातील काही खासगी शाळा विद्यार्थ्यांना त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची चाचणी करण्यास भाग पाडत आहे. संपूर्ण अहवाल दिल्यावरच शाळेत प्रवेश देऊ, असा फतवा काढला आहे.
एका बेंचवर एकच विद्यार्थीशाळेतील गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी दुसºया दिवशी या प्रकारे एक दिवसआड विद्यार्थ्यांना बोलविण्यात येणार आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जाणार आहे. दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फूट अंतर ठेवण्यात येणार आहे. शाळेत जेवणाची सुटी नसेल.
३४ शिक्षक पॉझिटिव्हशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी २२ नोव्हेंबरपर्यंत कोविड-१९ साठीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील चार हजार ३०६ शिक्षकांनी आतापर्यंत कोरोना चाचणी केली आहे. यातील ३४ शिक्षक पॉझिटिव्ह निघाले आहेत.शाळा सुरू होण्याची जय्यत तयारी बघण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांनी आठ ते १० शाळांना रविवारी भेटी दिल्या. यात शाळांचे निर्जंतुकीकरण झाले काय, बसण्याची व्यवस्था व इतर बाबी तपासून पाहिल्या.
विद्यार्थ्यांना न्यावे लागणार संमती पत्रविद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, यासाठी पालकांची लेखी संमती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. ज्या विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल, त्यांच्यासाठी आॅनलाईन गृहपाठाची व्यवस्था केली जाणार आहे.