बल्लारपूर : तालुक्यात चार महिन्यांपासून भरपूर पाऊस पडल्यामुळे नदी, नाल्यात रेतीचा भरपूर साठा जमा झाला आहे. याचा फायदा घेत रेती तस्कर दिवसरात्र रेती खनन करीत आहे. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. हे सर्व तहसील प्रशासन उघड्या डोळ्यांनी आठ महिन्यांपासून पाहत आहे. रेती तस्करांचा एकही ट्रॅक्टर जप्त करण्यात आला नाही. या रेती तस्करांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव देवतळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
मागील तीन वर्षांपासून रेतीघाटाचे लिलाव होत नाहीत. लिलावाच्या आधीच रेती तस्कर रेतीची चोरी करून घाट खाली करतात. यामुळे कोणीच रेतीघाट घेत नाही. बल्लारपूर तालुक्यात पळसगाव येथे दोन, बामणी, दुधोली, कोर्टी मक्ता, मोहाडी तुकूम असे पाच रेतीघाट आहेत. याशिवाय कळमना, कोठारी येथील नाल्यातून दिवसरात्र रेती तस्कर ट्रॅक्टरने रेतीचा अवैध उपसा करीत आहेत. या कामाला तालुक्यातील १०० ट्रॅक्टर अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत आहे, असेही निवेदनात तालुकाध्यक्ष महादेव देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राकेश सोमाणी, आरिफ शेख यांनी म्हटले आहे.
140921\img-20210914-wa0192.jpg
उपविभागीय अधिकारी डॉ.दीप्ती सुर्यवंशी यांना निवेदन देताना कार्यकर्ते