आगीत जळून खाक झालेल्या मिश्र रोपवनाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी : शिवनपायली येथील नागरिकांची मागणी
पळसगाव (पि) : चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोडधा येथील वनविभागाचे मिश्र रोपवन १६ फेब्रुवारीला जळून खाक झाले. या रोपवनाला रोजंदारी वनमजुरांनी साईड बाउंडरी जाळण्यासाठी आग लावली आणि या आगीने हवेच्या झुळकीने संपूर्ण रोपवन जळून खाक झाले. स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात इसमविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शिवनपायली येथील नागरिकांनी ही आग वनविभागाच्या रोजंदारी मजुरांनी बॉर्डर साफ करण्यासाठी लावल्याचा आरोप केला आहे.
पाच दिवस होऊनही वनविभागाने अजूनपर्यंत कुठलीच कारवाई केली नाही. या गंभीर बाबीची योग्यरीत्या चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवनपायली येथील नागरिकांनी केली आहे. सन २०१९ ला वनविभाग ब्रम्हपुरी अंतर्गत, वनपरिक्षेत्र तळोधी(प्रादेशिक), उपक्षेत्र, नेरी निमक्षेत्र बोळधा कक्ष क्र ४२४ येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात २० हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले होते. या रोपवनात एकूण २२ हजार अनेक प्रजातींची रोपे लावण्यात आली होती. या रोपवनावर शासनाने मागील दोन वर्षात अंदाजे करोडो रुपये खर्च करून मिश्र प्रकारचे सुंदर रोपवन तयार केले होते. अनेक प्रकारचे झाडे तयार होऊन सुंदर रोपवन तयार झाले होते. परंतु वनमजुरांच्या निष्काळजीपणामुळे शासनाचे करोडो रुपयाचे क्षणात नुकसान झाले, असा आरोप शिवनपायली येथील नागरिकांनी केला आहे.
कोट
मी शेतात रोपवनाजवळ बैल चारीत असताना वनमजुरांनी साईड व काठावरचे गवत पेटवले. त्यामुळे ही आग लागली. सर्व रोपवन जळून खाक झाले. तेव्हा दोषींवर कडक कारवाई वनविभागाने करावी.
- वामन बोरकर, ग्रामस्थ, शिवनपायली
कोट
रोपवनात उंच असलेला गवत व कचरा जळाला. परंतु ब्रिडिंग केल्यामुळे रोपे जळाली नाही. या घटनेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
-खोब्रागडे, क्षेत्र सहायक, नेरी.