चंद्रपूर : प्राथमिक शाळेचा प्रथम पाया म्हणून अंगणवाडी केंद्राकडे बघितले जाते. मात्र जिल्ह्यातील तब्बल २८० अंगणवाडी केंद्रांना इमारतच नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे अद्यापपर्यंत अंगणवाडी केंद्र सुरू झाले नाही. मात्र मागील वर्षापर्यंत या अंगणवाडीतील चिमुकल्यांना समाजभवन, ग्रामपंचायत तसेच मिळेल त्या जागेत बसून ज्ञानार्जन करावे लागले.
औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कोळसा खाणी, लोखंड, सिमेंट एवढेच नाही तर ताडोबासारखा व्याघ्र प्रकल्प जिल्ह्यात आहे. त्यामुळे देशातीलच नाही तर विदेशातीलही नागरिक चंद्रपूरला अधिक पसंती देतात. मात्र आजही काही गोष्टींमध्ये जिल्ह्याची पाहिजे तशी प्रगती झालीच नसल्याचे वास्तव आहे. अशीच स्थिती अंगणवाडी केंद्राचीही आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६८४ अंगणवाडी केंद्र आहेत. यामध्ये २ हजार ५६५ अंगणवाडी तर ११९ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. मात्र यातील तब्बल २८० अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारतच नाही. यामध्ये २११ मोठ्या तर ६९ मिनी अंगणवाड्यांना इमारत नाही. त्यामुळे काही ठिकाणी भाड्याच्या जागेत तर काही ग्रामपंचायत, विविध समाजमंदिरामध्ये मागील वर्षापर्यंत अंगणवाडी भरविली जात होती. यावर्षी कोरोना संकटामुळे अद्यापपर्यंत अंगणवाडी सुरू झाली नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर पुन्हा या चिमुकल्यांना अंगणवाडीच्या हक्काच्या इमारतीपासून वंचित राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ५५० अंगणवाडी केंद्राला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले असून, येथील बालकांना सर्वसुविधा पुरविल्या जात आहेत.
बाॅक्स
एकूण अंगणवाडी
२,६८४
इमारत असलेल्या
२,४०४
इमारत नसलेल्या २८०
बाॅक्स
जागा मिळेल तिथे आधार
कोरोना संकटामुळे यावर्षी अद्यापही अंगणवाडी सुरू झाल्या नाही. मात्र मागील वर्षीपर्यंत ज्या अंगणवाडी केंद्रांना इमारत नाही तसेच भाड्याची जागाही मिळत नाही, त्या गावातील अंगणवाडी जागा मिळेल तिथे भरवून चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे दिले जात होते. त्यामुळे किमान आतातरी या अंगणवाडीच्या इमारती तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---
जिल्ह्यात ५५० आयएसओ अंगणवाड्या
जिल्ह्यातील २८० अंगणवाडी केंद्रात इमारत तसेच इतर सुविधा नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ५५० अंगणवाडी केंद्रांना आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे. या अंगणवाडी केंद्रामध्ये खेळणी, पाणी, परसबाग, बोलक्या भिंती, प्रथमोपचार केंद्र, चप्पल स्टॅन्ड, किचन आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.