स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईलमध्ये विविध ॲप्लिकेशन आले आहेत. याचाच फायदा सायबर चोर घेत आहेत. विविध गेम, लॉटरी, कूपन यासह वेब सिरीज, मूव्हीज फ्री मध्ये देण्याचे आमिष देऊन ॲप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करण्यात येते. यामध्ये ऑटोरिड ओटीपी ही प्रक्रिया असल्याने आपण ते ॲप डाऊनलोड करताच बँक खात्यातून पैसे गायब होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे स्मार्ट फोन वापरताना अशा प्रकारच्या नोटिफिकेशन आल्यास पूर्ण खातरजमा करुन त्या हाताळाव्यात. विनाकामाचे व अनोळखी ॲप डाऊनलोड करु नये, अन्यथा आपणसुद्धा फसवणुकीला सामोर जाऊ शकतो, असे सायबर तज्ज्ञांनी कळविले आहे.
बॉक्स
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
१ आपल्या बँक खात्यातून पैसे गहाळ झाल्यानंतर लगेच तक्रार करणे गरजेचे असते; मात्र अनेकजण उशीर करतात. तक्रारीसाठी बँक स्टेटमेन्ट, ट्रान्जेक्शन आयडी, ज्या ठिकाणावरुन काॅल किंवा मेसेज आला असेल तो नंबर गरजेचा आहे. तेव्हाच पैसे परत मिळण्याची शक्यता असते. नाहीतर पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते.
२ चंद्रपूर रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत मागील काही दिवसांपूर्वी असा प्रकार घडला होता. या प्रकरणाची वेळीच तक्रार आल्याने ५८ हजार रुपये परत मिळविण्यास पोलिसांना यश आले आहे, परंतु त्यासाठी वेळीच तक्रार करणे गरजेचे आहे.
३. अनेक प्रकरणात वेळीच तक्रार होत नसल्याने पोलिसांना तो नंबर ट्रेस करणे कठीण जाते. तो नंबर आऊट ऑफ एरिया किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत असते.
बॉक्स
अनोळखी ॲप नकोच
अनेकजण स्मार्टफोनद्वारेच ऑनलाईन व्यवहार करतात. आपला मोबाईल नंबर बँक खात्याला जोडला असल्याने कोणतेही अनोळखी ॲप डाऊनलोड करण्यास परवानगी देऊ नये, गेम किंवा अनोळखी ॲप डाऊनलोड करताना खातरजमा करुनच डाऊनलोड करावा.
लॉटरी, किंवा पैसे जिंकल्याचे मेसेजेस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे, ते मेसेज डिलिट करावेत. अशाप्रकारे प्रत्येक व्यवहार करताना काळजी घेतल्यास व अनोळखी लिंक किंवा स्मार्टफोनचा वापर जपून केल्यास आपण फसवणूक टाळू शकतो.
बॉक्स
वर्षाला लाखो रुपयांची फसवणूक
तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर वाढला आहे. अनेकजण स्मार्टफोनद्वारे ऑनलाईन व्यवहार करीत आहेत. त्यामुळे व्यवहार सुकर झाला असून धोकाही वाढला आहे. सायबर भामटे सक्रिय असतात. वेगवेगळे आमिष दाखविणारे मेसेज पाठवून ते बँक खात्यातून रक्कम गहाळ करीत असतात.
वर्षाला साधारणत: दहा ते २० लाख रुपयांचा गंडा ऑनलाईनच्या माध्यमातून घातला जातो. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे असते.
कोट
मोबाईलद्वारे ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोणतीही लिंक, अनोळखी ॲप, गेम डाऊनलोड करताना खातरजमा करणे गरजेचे आहे. बँक अधिकारी कधीच आपल्याला खात्यासंदर्भात माहिती विचारत नाही. त्यामुळे आपली वैयक्तिक माहिती आधार नंबर, मोबाईलवर आलेली ओटीपी कुणालाही देऊ नये. आमिष दाखविणारे मेसेज, लॉटरी, बक्षीस जिंकले असे मेसेज आल्यास ते संपूर्ण चौकशी केल्याशिवाय उघडू नये.
- निशिकांत रामटेके, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर क्राईम चंद्रपूर
-------
आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे
२०१९- ५०
२०२०-३४
२०२१-१६