चंद्रपूर : जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. कोरोनापासून सुरक्षा म्हणून विद्यार्थी आता बॅगेमध्ये शालेय साहित्यासह सॅनिटायझरही नेत आहेत. चाॅकलेट नको तर सॅनिटायझरची बाॅटल दे, अशी मागणी पालकांकडे करीत असल्याचे दिसून येत आहे.
देशभरात मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे इतर सर्व क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम पडला आहे. कधी नव्हे तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याची वेळ यावर्षी आली आहे. दरम्यान, नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यासाठी पालकांचे विशेष संमतिपत्रही भरून घेण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी आणि रोजच्या सवयींमध्ये मोठा बदल जाणवत आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक जण तशी काळजी घेत आहेत. शाळेत जाताना मुले टिफिन, पाण्याच्या बॉटलसह आता दप्तरात सॅनिटायझरची बाॅटल टाकली की नाही, याची खातरजमा स्वत:हून घेत आहेत. विशेष म्हणजे, शाळा सुरू झाल्यापासून मास्क तसेच सॅनिटायझरच्या विक्रीत वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील शाळांची सद्यस्थिती
पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा
१४२८
सुरू झालेल्या शाळा
१४४५
विद्यार्थ्यांची संख्या
१,२५,५६२
शिक्षकांची उपस्थिती
३५७१
--
विद्यार्थी म्हणतात.....
शाळा सुरू झाल्यामुळे आता छान वाटत आहे. दररोज शाळेत ऑक्सिमीटर तसेच तापमान मोजले जात आहे. आम्ही शाळेत जाताना सॅनिटायझर लावून जातो तसेच येतानाही त्याचा वापर करीत आहेत.
-रीना हनवते
चंद्रपूर
----
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी शाळेत जाताना मास्क तसेच सॅनिटायझरने हात धूत आहे. न चुकता दररोज याकडे लक्ष देत आहे. स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याच्या सूचना शिक्षकांकडून केल्या जात आहे. शाळेमध्येही विद्यार्थी सॅनिटयझरचा वापर करीत आहे. तसेच वारंवार हात धतत आहे.
रुद्र लडके
चंद्रपूर
---
कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. हात धुण्याकडे तसेच सॅनिटायझर लावण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थी पूर्णवेळ मास्क लावत आहेत, तसेच नियमांचे पालनसुद्धा करीत आहेत.
-शौर्या ससनकर
चंद्रपूर
बाॅक्स
एकही बाधित नाही
जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग २३ नोंव्हेंबरपासून सुरू झाले तर पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. शाळा सुरू करताना शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. सोशल डिस्टन्स पाळून विद्यार्थ्यांना बसविले जात आहे. गर्दी होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्यामुळे सध्यातरी जिल्ह्यामध्ये एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागत झालेली नाही. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स हे नियम पाळले जात आहेत. विशेषत: विद्यार्थीही दक्ष असल्याचे दिसून येत आहे.
-