घनश्याम नवघडे
नागभीड : पीक विमा कंपन्यांनी नागभीड तालुक्यासाठी पीक विम्यापोटी एक कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये जून महिन्यातच मंजूर केले आहेत. मात्र, पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. जोपर्यंत शासन आपली भागीदारी विमा कंपन्यांकडे जमा करीत नाही, तोपर्यंत विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे.
नागभीड तालुक्यात आठ हजार ५८८ शेतकरी पीक विम्याचे लाभार्थी आहेत. आणि हेक्टरी एक हजार १७६ रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. मागील वर्षीच्या हंगामात अगोदर परतीच्या पावसाने आणि नंतर विविध रोगांनी तालुक्यातील धान पीक पुरते नेस्तनाबूत केले. प्रत्येक गावातील जाहीर करण्यात आलेली शासकीय पैसेवारीही ५० टक्क्यांच्या आत होती. म्हणूनच शेतकऱ्यांकडून पीक विम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर दबाव वाढल्यांनतर विमा कंपन्यांनी ही मागणी मान्य करीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याइतकी का होईना,पण पीक विमा देण्याचे जाहीर करून जून महिन्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करून तालुक्यातील ८ हजार ५८८ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७३ लाख ४० हजार ७९२ रुपये मंजूर केले. एवढेच नाही तर लाभार्थी शेतकऱ्यांच्या तशा याद्याही संबंधित कृषी कार्यालयांना रवाना करण्यात आल्या.
दरम्यान, काही जाणकार शेतकऱ्यांनी येथील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून या वेळकाढूपणाबद्दल विचारणा केली. तालुका कृषी कार्यालयाने यासंदर्भात संबंधित विमा कंपनीकडे चौकशी केली असता आम्ही शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम देण्यास तयार आहोत. पण शासनाकडून भागीदारीची रक्कम प्राप्त झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम टाकण्यास अडचण येत असल्याची माहिती या पीक विमा कंपनीकडून तालुका कृषी कार्यालयास देण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. हा संदर्भ घेऊन प्रस्तुत प्रतिनिधीने येथील तालुका कृषी कार्यालयास विचारणा केली असता या कार्यालयाकडून या बाबीस दुजोरा देण्यात आला.
बॉक्स
तीन महिने लोटले; मात्र विम्याचे पैसे मिळाले नाहीत
या बाबीस आता अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी होत असला तरी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली नाही. यामुळे शेतकरी वर्गात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. सध्या पिकाच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना एक एक रुपयाची गरज आहे. पैशांअभावी शेतकरीही मेटाकुटीस आला आहे. मात्र याचे कोणतेही सोयरसुतक विमा कंपन्यांना नाही.