भिसी : जानेवारी २०२१मध्ये भिसी ग्रामपंचायत निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर भिसी नगरपंचायत होणार असल्याची पहिली अधिसूचना शासनाने काढली. त्यामुळे एकदा ग्रामपंचायत व काही महिन्यातच नगरपंचायत निवडणूक लढावी लागेल, त्यापेक्षा सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन थेट नगरपंचायत निवडणूक लढवायची, असा सर्व गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय झाला. एकूण ६७ पैकी ६६ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. निवडणूक रद्द झाली. भिसी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. मात्र सहा महिने लोटले तरी भिसी नगरपंचायत होण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता स्थानिक सर्व राजकीय गट व जनताही हैराण झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज उचलल्याचा उमेदवारांना आता पश्चाताप होत आहे.
आपापल्या वाॅर्डातील परिचित लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावातील जनता हक्काने आपापल्या समस्या सोडवायची. पण आता ही सोयच उरली नाही. १७ सदस्य असलेल्या भिसी ग्रामपंचायतीवर आता किती काळ प्रशासकाची सत्ता राहील, हा प्रश्न नेते व उमेदवारी अर्ज उचलणाऱ्यांना सतावत आहे. अरविंद रेवतकर गट, धनराज मुंगले गट, किशोर मुंगले गट, वंचित आघाडी गट, अनेक अपक्ष उमेदवार यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती.
आपण फॉर्म उचलले नसते तर गावावर ही पाळीच आली नसती, असे मत व्यक्त करताना तत्कालीन उमेदवार दिसतात. प्रशासक व प्रभारी ग्रामसचिव या दोघांच्या खांद्यावर भिसीसारख्या १७ ते १८ हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावाचा भार आहे. दोन अधिकाऱ्यांना कामाच्या मर्यादा आहेतच. त्यामुळे लोकांचे वेळेत प्रश्न सोडविणे व विकासही करणे यालाही मर्यादा पडतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन करण्यात आले. नगरपंचायतीची सगळी प्रक्रिया थांबली. आता या प्रक्रियेला वेग देण्यात यावा, लवकरात लवकर भिसी नगरपंचायतीची निर्मिती करून निवडणूक घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नगरपंचायत निर्मितीची प्रक्रिया थांबली होती. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत नगरपंचायत निर्मितीचा कार्यक्रम निघू शकतो. त्यानंतर प्रभागनिर्मिती, मतदार याद्या, परिसिमन इत्यादी कामे होतील. नगरपंचायत निर्मितीला वेळ लागेल, नेमका किती कालावधी लागेल, हे सांगता येत नाही. आता प्रशासकांमार्फतच गावाचा कारभार चालेल.
- संजय नागटिळक,
तहसीलदार, चिमूर.