केवळ दुर्लक्ष : शासन दरबारी अद्यापही नोंद नाही
रत्नाकर चटप
नांदाफाटा : राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यांतील निजामकालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या अनेक इमारती आजही आहेत. राजुरा उपविभागातील शरज, कोडशी, वनसडी, पार्डी, कडोली आदी गावांमध्ये निजामकालीन पोलीस स्टेशन, नाका, भांडारगृह दिसून येते. राजुरा शहरात तलावालगत निजामकालीन मार्ग दाखवणारा फलक आजही आहे; परंतु याकडे शासनाचे अद्यापही दुर्लक्ष आहे.
या इमारतींची डागडुजी किंवा हा वारसा जपून ठेवण्यासाठी कुठलीही तरतूद शासनामार्फत अद्यापही करण्यात आलेली नाही. १६ सप्टेंबर १९४८ रोजी राजुरा, कोरपना, जिवती तालुका निजाममुक्त झाला. आज ७३ वर्षे उलटूनही निजामकालीन इमारतीचे रक्षण वा दुरुस्ती करण्यात आली नाही. पूर्वीच्या मराठवाड्यात असलेल्या राजुरा तालुक्यात अनेक शाळा निजामकालीन कालावधीत बांधकाम करण्यात आल्या. राजुरा येथील जिल्हा परिषद शाळा याचा उजाळा करून देते. आजही या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. स्वातंत्र्याची ७४ वर्षे लोटली खरी; परंतु स्वातंत्र्याचा उजाळा देणारे स्मारक मात्र शासन दरबारी दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी राजुरा मुक्तिसंग्राम दिनाच्या इतिहास हा ऐतिहासिक ठेवा असणार आहे आणि या आठवणी जपून ठेवण्याची जबाबदारी शासनाची असतानादेखील याकडे कुणाचेच लक्ष नाही.
बॉक्स
पारडीतील इन्स्पेक्शन बंगलाही ओसाड
निजामकाळातील प्रमुख आठवण करून देणारा इन्स्पेक्शन बंगला आजही तेलंगणा सीमेलगत असलेल्या पारडी गावात आहे. निजाम काळात बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या वस्तू शासकीय अधिकारी तसेच वाहने विविध साहित्याची चाचपणी या इन्स्पेक्शन बंगल्याअंतर्गत करण्यात येत होती. आजही बंगल्याची इमारत चांगल्या स्थितीत आहे. मात्र, दुर्लक्षित व ओसाड झाला आहे. शासनाने हा वारसा जपणे गरजेचे आहे.