बामणीत मुक्कामाने असलेल्या १५ कुटुंबांची उपासमार
मंगल जीवने
बल्लारपूर : कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रकारच्या उपाययोजना करत आहे. गरजूंना अन्नधान्याची मदत, स्वस्त मोफत धान्याची मदत, व्हॅक्सिनची सोय, परंतु भटक्या नागरिकांकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
ही व्यथा आहे, बामणी येथे सोमाणी काॅम्प्लेक्सच्या समोरील मैदानात कोरोना काळात वास्तव्य असलेल्या १५ भटक्या कुटुंबाची. ते आपल्या छोट्या मुलाबाळांसह मागील दीड वर्षांपासून कुटुंब घेऊन वास्तव्यास आहेत व कोरोना संसर्ग संपायची वाट पाहत आहेत. ना कोणाची मदत, ना प्रशासनाकडून कोरोना तपासणी, ना लस घेण्याची चिंता, ना मास्क ना सामाजिक अंतर, असे या कुटुंबाचे उघड्यावर आपल्या कुटुंबीयांसोबत बिनधास्त वास्तव्य आहे. प्रशासनाच्या पथकातील गाड्या दिवसभर इकडून तिकडे फिरत असतात, परंतु त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. कोरोना संकटात या कुटुंबापर्यंत अजून तरी ग्रामपंचायत बामणी किंवा तहसील प्रशासनाची मदत पोहोचली नाही किंवा विचारणा केलेली नाही.
एका कुटुंबाबातील इसमाने सांगितले की, मागच्या वर्षी आम्ही इथे आलो व कोरोना संसर्ग सुरू झाल्यामुळे आम्हाला इथेच थांबावे लागले. या काळात मात्र आम्हाला अनेकांनी जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य केले, परंतु यावेळेस मात्र आम्हाला दारोदारी भटकून उदरनिर्वाह करावा लागत आहे. आमच्याकडे स्वस्त धान्याचे रेशन कार्ड नाही. यामुळे सरकारचे मोफत धान्यही आम्हाला मिळत नाही. कुटुंबाचे पोषण कसे करावे, याचा आम्हाला विचार पडला आहे.
कोट
बामणेत कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. अशा वेळी बामणीत येऊन ग्रामपंचायतला न विचारता १५ कुटुंबांसह थांबण्याची माहिती ग्रामपंचायतीला देणे गरजेचे होते, परंतु तशी परवानगी या लोकांनी घेतली नाही. याची माहिती आम्ही तहसीलदार यांना देणार आहे.
- सुभाष ताजने, सरपंच, ग्रामपंचायत, बामणी.