चंद्रपूर : चंद्रपूर येथे होऊ घातलेला मेडीकल कॉलेज आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच जिल्ह्यात मेडीकल कॉलेजमध्ये रस नसल्याने ते गप्प आहेत. जिल्ह्यातील आमदाराला राज्याचे वित्त खाते मिळाले, ही अभिमानस्पद बाब आहे, मात्र निष्क्रीय मंत्री जिल्ह्याला नको. सुधीर मुनगंटीवार यांच्या पक्षाची राज्यात व केंद्रात सत्ता असून त्यांच्याकडे महत्त्वाचे खाते असूनही जिल्ह्यातील प्रश्न सोडविता येत नसतील तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. केंद्र व राज्य सरकारच्या जनहित विरोधी धोरणांच्या विरोधात मंगळवारी काँग्रेस कमिटीतर्फे चंद्रपुरात धरणे आंदोलन व जिल्हा बंद आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनादरम्यान गांधी चौक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत नरेश पुगलिया बोलत होते. यावेळी नरेश पुगलिया म्हणाले, चंद्रपूर येथे शासकीय मेडीकल कॉलेज मंजूर झाले. कॉलेज सुरू होण्याची शंभर टक्के तयारीही पूर्ण झाली. दवाखान्यासाठी लागणारी इमारत, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करून शासकीय मेडीकल कॉलेजचा फलक लावण्यात आला. परंतु, एमसीआयने १३ जानेवारी २०१५ ला २४ त्रुट्या काढल्या होत्या. त्याची पुर्तता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केली. १५ मे पूर्वी एमसीआयने त्रृटींची पुर्तता करून केंद्रीय आरोग्य विभागाकडे अहवाल सादर करायचा होता. परंतु, त्यांनी परत भेट न देता मंजूरी नाकारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांत असंतोष पसरला आहे. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे यावर काहीच बोलण्यास व करण्यास तयार नाही. त्यांना जिल्ह्यातील प्रश्न सोडविता येत नसतील तर महत्त्वाचे खाते असूनही उपयोग कोणता, असा प्रश्न करीत त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असे नरेश पुगलिया म्हणाले. मेडीकल कॉलेजसाठी आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र व राज्य सरकारकडे मेडीकल कॉलेजचा मुद्दा रेटून धरावा, अन्यथा जिल्ह्यात पून्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नरेश पुगलिया यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, युवक काँग्रेसचे महासचिव राहूल पुगलिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अॅड. अविनाश ठावरी, मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, एनएसयुआय अध्यक्ष स्वप्नील तिवारी, प्रा. प्रमोद राखुंडे, मनपा गटनेते प्रशांत दानव, अॅड. शिल्पा आंबेकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पालकमंत्री संकुचित विचाराचेजिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे संकुचित विचाराचे आहेत. ते केवळ बल्लारपूर क्षेत्रावर मेहरबान असून पालकमंत्री असूनही जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांनी चंद्रपुरात मेडीकल कॉलेजची घोषणा केली होती. आता मेडीकल कॉलेज रद्द होण्याच्या मार्गावर असतानाही पालकमंत्री मात्र यावर काहीच बोलण्यास तयार नाही. विकास करायचा असेल तर पूर्ण जिल्ह्याचा करावा, अन्यथा पदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावे, असा सल्ला नरेश पुगलिया यांनी पालकमंत्र्यांना पत्रकार परिषदेतून दिला आहे.
पालकमंत्र्यांनाच नाही मेडिकल कॉलेजमध्ये रस
By admin | Published: May 27, 2015 1:22 AM