चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आलेख आता घसरणीला लागला आहे. मात्र मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. बाधितांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना थोडा दिला; परंतु, कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नावाचा भयानक आजार काहींना जडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कोरोना निगेटिव्ह झालेले काही रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत. अशा २० रुग्णांची जिल्हा आरोग्य प्रशासनाने नोंद घेतली. हे रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यावरील औषधी अत्यंत महाग आहे. लिपोसोमल एम्फोटिसिरीन-बी हे औषधच चंद्रपुरातील मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध नाही. अनियंत्रित मधुमेह व स्टेराईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांवर स्टेराईडचा वापर करताना काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
चंद्रपुरात २० पेक्षा अधिक रुग्ण
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे अधिकृत २० रुग्ण असल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली. मात्र, यापेक्षा अधिक रुग्ण असण्याची शक्यता आहे.
कोरोनापूर्वी वर्षाला १० ते १२ एम्फोटिसिरीन -बी इंजेक्शन लागायचे
आता ६० ते ७० इंजेक्शनची चंद्रपुरात दररोज मागणी आहे.
पॉसॅकोनाझोल गोळ्यांचा तुटवडा आहे. रुग्णांच्या कुटुंबांकडून दररोज या औषधांची मागणी होत असल्याची माहिती एका औषध विक्रेत्याने दिली.
औषधांअभावी रुग्णांचा जीव धोक्यात
म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना एम्फोटिसिरीन -बी हे इंजेक्शन दिले जाते. शिवाय पॉसॅकोनाझोल गोळ्याही द्यावे लागतात. परंतु औषधेच उपलब्ध नसल्याने खासगी डॉक्टर्स काहीे आनुषंगिक औषधांचा वापर करीत आहेत. अशा रुग्णांना औषध मिळाले नाही तर डोळा व अन्य अवयव निकामी होण्याचा धोका आहे.
७५०० रुपयांचे इंजेक्शन १५ हजारांना!
म्युकरमायकोसिसवरील रुग्णाला देण्यात येणाऱ्या लिपोसोमल एम्फोटिसिरीन-बी एका इंजेक्शनची किंमत ७ हजार ६०० आहे. परंतु, काही विक्रेते ते १५ हजारांना विकत आहेत, अशी तक्रार एका रुग्णाच्या कुटुंबाने दिली तर चंद्रपुरात सात दिवसांपासून हे इंजेक्शनच नसल्याने मिळणार तरी कसे, असा प्रश्न जटपुरा गेट परिसरातील एका औषध विक्रेत्याने उपस्थित केला.
जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण हवे
म्युकरमायकोसिस झालेल्या गरीब रुग्णांवर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याची घोषणा राज्य सरकारने दिली. चंद्रपुरातील २० पेक्षा किती रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत आहे, हे प्रशासनाने अद्याप जाहीर केले नाही. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार झाला. दरम्यान, नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर रेमडेसिविर वितरणाची जबाबदारी प्रशासनाने स्वत:कडे घेतली. म्युकरमायकोसिसवरील औषधांबाबतही जिल्हा प्रशासनाने अशी कार्यवाही करण्याची गरज आहे.