लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम हाती घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यक्रमासाठी ही अद्यावत मतदार यादी वापरली जाणार आहे. दुबार, स्थलांतरित तसेच मयत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. तसेच १८ वर्ष पूर्ण झालेल्या पात्र मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी नोंदणी करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मिळालेला हक्क म्हणजे मतदानाचा. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाची संधी मिळत असते. लोकशाही सक्षम बनविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोणत्याही महत्वाच्या निवडणुकीअगोदर मतदार यादीचे पुनरिक्षण करण्यात येते. जानेवारी महिन्यात जिल्हात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासह १ जानेवारी २०२२ रोजी ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहे. तसेच ज्यांनी अद्यापही आपले नाव मतदार यादीत नोंदवले नाही. त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नाव नोंदणीसाठी अर्जाचे नमुने- प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदार संघात स्थलांतर केले असल्यास अर्ज क्रमांक ६- अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ अ- इतर नावाबाबत आक्षेपासाठी, स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी अर्ज क्रमांक ७- मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरस्त्या करण्यासाठी अर्ज क्रमांक ८- मतदार संघातील निवासाचे ठिकाण बदलेले असल्यास अर्ज क्रमांक ८ अ
हे कागदपत्र गरजेचेमतदार नोंदणी करण्यासाठी ओळपत्र आणि वयाचा दाखला गरजेचा आहे. ओळपत्रामध्ये जन्म दाखला, पासपोर्ट, वाहनचालक परवाना, बॅक पासबूक, रेशन कार्ड यापैकी कुठलाही एक प्रमाणपत्र तर वयाच्या दाखल्यामध्ये शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना यापैकी कोणत्याही एक कागदपत्राची आवश्यता आहे.
मतदार नोंदणी करा
लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. ३० नोव्हेंबरपासून सर्वत्र मतदार नोंदणी सुरु आहे. ज्याचे वय १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहे. त्यांनी संबंधित तहसील कार्यालयात किंवा मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) कडून अर्ज भरुन मतदार नोंदणी करुन घ्यावी.- परीक्षित पाटील, तहसीलदार, सावली
मी केलीय नोंदणी
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदणीबाबत उत्सुकता होती. नोंदणीसाठी आवश्यक असलेली वयाची अट पूर्ण झाल्याने तसेच मतदार प्रक्रिया सुरु झाल्याने नोंदणीसाठी अर्ज केला आहे. पहिले मतदान करण्याबाबत उत्सुकता आहे.- प्रद्युत डोहणे, सावली
१३, १४ व २७, २८ नोव्हेंबरला विशेष मोहीममतदार जागृती करण्यासाठी व मतदार नोंदणी करण्यासाठी राज्यभरात १३ व १४ नोव्हेंबर तसेच २७ व २८ नोव्हेंबर या चार दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी नोंदणी करुन घ्यावी, असे प्रशासनानी आवाहन केले आहे.