चंद्रपूर : स्कूलबसचा परवाना नसतानाही बोगस चेसिस नंबरद्वारे स्कूलबस रस्त्यावर धावत असल्याचा प्रकार नुकताच भद्रावती तालुक्यातील माजरी येथे समोर आला आहे. या प्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षक तुषार हटवार यांच्या तक्रारीनुसार यवतमाळ येथील स्कूल बसचालक व मालकांविरुद्ध माजरी पोलिस ठाण्यात कलम ४१७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भद्रावती तालुक्यात वायुवेग पथकांमार्फत स्कूलबस तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, मोटार निरीक्षक तुषार हटवार यांनी नागलोन गावाजवळ एमएच २९ ए ८१६० ही स्कूलबस थांबवून तिची पाहणी केली. यावेळी या स्कूलबसचा परवाना आढळून आला नाही. तसेच कागदपत्रावरील चेसिस नंबर हा ऑनलाइन रेकॉर्डशी मॅच केला असता, त्यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे मोटार वाहन निरीक्षक अमोल मालठाणे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे तसा अहवाल सादर केला. यावेळी शासकीय अभिलेखावर तसेच स्कूलबसवर वेगवेगळे चेसिस नंबर आढळून आले. शासनाची दिशाभूल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई चंद्रपूर आरटीओ किरण मोरे यांच्या नेतृत्वात मो. वा. नि. मनीषकुमार मडके, मो.वा.नि. नरेंद्र उमाळे, वाहनचालक गजानन टाले, आदींनी केली.
स्कूलबसमध्ये आढळला सुविधांचा अभाव
स्कूलबसमध्ये विविध सुविधा असाव्यात, अशी नियमावली संबंधित विभागाने तयार केली आहे. मात्र या स्कूलबसमध्ये कोणतीही अग्निशामक यंत्रणा, सूचक इंडिकेटर नसून, बस विद्यार्थी वाहतूककामी सुयोग्य स्थितीत नव्हती, दुसऱ्याच वाहनाचा चेसिस नंबर लावण्यात आला होता.
इतर स्कूलबसही आरटीओच्या रडारवर
माजरी येथे स्कूलबसवर झालेल्या कारवाईने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटीओ किरण मोरे यांनी स्कूलबस तपासणी मोहीम कठोर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व स्कूलबसची तपासणी होणार आहे. परिणामी स्कूलबस संचालकांचे धाबे दणाणले आहेत.
बोगस चेसेस नंबर लावून शासकीय महसूल बुडवत स्कूलबस धावत असल्याचे समोर आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता स्कूलबस तपासणीसाठी पथक गठित केले असून तपासणी मोहीम जिल्ह्याभरात राबविण्यात येणार आहे. दोष आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
- किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर