व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज हवे
चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे. त्यामुळे बेरोजगारांना कर्ज पुरवठा करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
भंगार वाहनांमुळे जागा व्यापली
चंद्रपूर : शासकीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने आहेत. त्यामुळे अस्वच्छतेत भर पडत असून जागाही गुंतली आहे. संबंधित विभाग प्रमुखांनी याकडे लक्ष देऊन या वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी केली जात आहे.
दाताळा मार्गावर अपघाताची शक्यता
चंद्रपूर : येथील दाताळा मार्गावरील इरई नदीवर नव्याने पूल बांधण्यात आला आहे. मात्र, या येथे अनेक जण रस्त्यावरच सेल्फी काढतात, तर काही जण पुलाच्या मध्येच आपले वाहन पार्क करीत आहेत. त्यामुळे अन्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील गर्दी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
रोहित्र देत आहे अपघाताला निमंत्रण
चंद्रपूर : शहरातील काही शासकीय इमारतीच्या परिसरात विद्युत रोहित्र आहेत. मात्र, बहुतांश रोहित्र उघडेच आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या एखाद्या नागरिकाचा स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महावितरण कंपनीने लक्ष घालून राेहित्र हटवावे, अशी मागणी हाेत आहे.
रस्त्यावरील माती उचलावी
चंद्रपूर : शहरातील बहुतांश रस्त्यांवर रेती तसेच माती साचली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. माती तसेच रेती उचलून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली जात आहे. काही नागरिक घराचे बांधकाम करण्यासाठी अगदी रस्त्यावरच बांधकाम साहित्य ठेवत आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. महापालिकेने याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
चंद्रपूर शहरात वाहतुकीचा खोळंबा
चंद्रपूर : शहरातील काही रस्त्यांवर मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
झोपडपट्टींचे निर्मूलन करावे
चंद्रपूर : दिवसेंदिवस शहरातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे घर बांधून नागरिक राहतात. विशेषत: झोपडपट्टीचा परिसरही वाढत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध करून देत शहरातील झोपडपट्टी निर्मूलन करावे, अशी मागणी केली जात आहे.
पक्ष्यांसाठी ठेवावे पाणीपात्र
चंद्रपूर :पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी शहरातील नागरिकांनी घराच्या बाहेर जल पात्रामध्ये पाणी भरून ते पक्ष्यांसाठी ठेवण्याची विनंती सामाजिक संस्थेने केली आहे. या सेवाभावी वृत्तीमुळे पक्ष्यांची काही प्रमाणात का होईना तहान भागेल, असा विश्वास संस्थांनी व्यक्त केला आहे.
परवानगी देण्यासाठी टाळाटाळ
चंद्रपूर : कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध पावले उचलली जात आहेत. कार्यक्रमांवरही बंदी आली असून परवानगी घ्यावी लागत आहे. मात्र, काही ग्रामपंचायती तसेच नगर परिषदेतील काही कर्मचारी परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. परिणामी, कार्यक्रम घेणाऱ्यांची मोठी धावपळ होत आहे.
प्रलंबित प्रकरणे निकाली काढावेत
चंद्रपूर : जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांकडे चंद्रपूरसह अन्य तीन जिल्ह्यांचा प्रभार देण्यात आला आहे. यासह संशोधन अधिकाऱ्यांकडे सुद्धा चंद्रपूर व गडचिरोली समाजकल्याण विभागाचा प्रभार आहे. त्यामुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. परिणामी, नागरिकांनी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एसटी वाहकांसमोर चिल्लरचा प्रश्न कायम
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून एसटीच्या वाहकांसमोर चिल्लरचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे प्रवाशांना मात्र याचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बसमधून प्रवास करताना टप्प्याप्रमाणे प्रवाशांकडून तिकिटाची रक्कम घेतली जाते. एखाद्या ठिकाणच्या प्रवासादरम्यान तीन टप्पे पडत असतील तर त्या प्रवाशाला तिकीट लागते.