दीपक साबने
जिवती (चंद्रपूर) : घरी केवळ दोन बल्ब, ना पंखा, ना टीव्ही. विजेचा वापर केवळ २० युनिट तरीही वीज वितरण कंपनीने एका गरीब शेतकऱ्याला चक्क एक लाख ३८० रुपयांचे वीजबिल पाठविल्याचा प्रकार जिवती तालुक्यात समोर आला आहे. यावरून विद्युत विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जिवती येथील केशवराव भिमू कोटनाके यांचे लहानसे कुडाचे घर आहे. घरात ना टीव्ही, ना पंखा, ना कूलर व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात उजेडासाठी विजेचे दोन बल्ब आहेत. तरीही त्यांच्या ग्राहक क्रमांक ४५६९५७०२०९०२ या वीजपुरवठा देयकावर फक्त २० युनिट वीज वापराचे एक लाख तीनशे ऐंशी रुपयांचे वीजपुरवठा देयक महावितरण कंपनीकडून प्राप्त झाले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेले वीजपुरवठा देयक पाहून केशवराव कोटनाके यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी तातडीने महावितरणचे कार्यालय गाठले. तेव्हा अधिकाऱ्यांनी ४४ हजार २९० रुपये इतके विज बिल करून दिले. परंतु इतके वीजपुरवठा देयक भरायचे तरी कसे, असा प्रश्न आता कोटनाके यांच्यासमोर आहे.
तालुक्यात तक्रारीच तक्रारी
जिवती तालुक्यात चुकीची रीडिंग घेणे, मीटरचे रीडिंग न घेणे, मीटर बंद दाखवून अंदाजे वीजपुरवठा देयके आकारून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार सुरूच आहे. तालुक्यात वीज वितरण कंपनीविरुद्ध अशा अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठांनी त्याकडे लक्ष देऊन त्या समस्या सोडवाव्या अशी मागणी होत आहे.
एकत्रित रीडिंगच्या बिलामुळे ग्राहकास वीजबिल जास्त आले. परंतु, सदर बिल महिन्यांमध्ये विभाजन करून दिल्याने ग्राहकास युनिट रेटचा फायदा मिळवून वीजबिल कमी होत आहे. एकत्रित आलेले बिल भरण्याकरिता टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ग्राहकांचे जुने बिल नियमित वापरापेक्षा व रीडिंग कमी असल्यामुळे कमी भरण्यात आले आहे. आम्ही सध्या चालू रीडिंग घेऊन योग्य बिले ग्राहकास देत आहोत.
- नितेश ढोकणे, उपअभियंता, एमएसईबी, जिवती.